नागपूर : मणप्पुरम गोल्ड लोनच्या कार्यालयावर 9 कोटी 33 लाखांचा दरोडा टाकणाऱ्या टोळीला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. बिहारमधील कुख्यात गुंड सुबोध सिंहच्या टोळीने नागपुरातील मणप्पुरम गोल्ड लोनच्या कार्यालयावर दरोडा टाकला होता.


28 सप्टेंबर 2016 रोजी नागपुरातील जरीपटका भागात मणप्पुरम गोल्ड लोनच्या कार्यालयात 6 बंदुकधारी लुटारूंनी दरोडा टाकला. यात 30 किलो 740 ग्राम सोनं आणि 3 लाख रोख अशा एकूण 9 कोटी 33 लाखांचा दरोडा टाकला होता. त्यानंतर ही टोळी फरार झाली होती.

बिहारचा कुख्यात गुंड सुबोध सिंह गँगने हा दारोडा टाकल्याचं उघड झालं होतं. या सुबोध सिंहने देशभरात मणप्पुरम गोल्ड लोनच्या विविध कार्यालयांवर दरोडे टाकत तब्बल 120 किलो सोनं लुटलं होतं.

याच सुबोध सिंहला 5 सहकाऱ्यांसह काल बिहार स्पेशल टास्क फोर्स टीमने अटक केली. त्यांच्याकडून 20 किलो सोन्याचे दागिने जप्त झाले आहेत.