मणप्पुरम गोल्ड लोनच्या शाखेवर दरोडा, 30 किलो सोन्याची लूट
एबीपी माझा वेब टीम | 28 Sep 2016 06:13 PM (IST)
नागपूर : नागपुरात मणप्पुरम गोल्ड लोनच्या शाखेवर दरोडा पडला आहे. या दरोड्यात तब्बल 30 किलो सोनं आणि तीन लाख रुपयांची रोकड लुटल्याची माहिती आहे. नागपुरातील जरीपटका पोलिस स्टेशन अंतर्गत भीमचौकावरील कुकरेजा कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या मणप्पुरम गोल्ड लोनच्या शाखेत ही मोठी लूट झाली. सहा लुटारुंनी शस्त्राच्या धाकावर 30 किलो सोनं आणि तीन लाख रुपयांची रोकड लुटून नेल्याची माहिती मणप्पुरमतर्फे पोलिसांना देण्यात आली आहे. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दरोड्याची घटना घडली. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.