Ratan Tata Firm Tata Motors Journey: देशातील सर्वात जुन्या उद्योगपतींपैकी एक आणि देशभरातील कोट्यवधी लोकांचा विश्वास गाठीशी असलेला उद्योग समूह म्हणजे, टाटा ग्रुप (TATA Group). टाटा आणि विश्वास असं एक अतूट नातं निर्माण झालं आहे. अशातच टाटा समूहाची कंपनी टाटा मोटर्स (TATA Motors) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे, टाटा मोटर्सचे शेअर्स. टाटा मोटर्सचे शेअर्स सध्या बाजारात धुमाकूळ घालत आहेत. गेल्या वर्षभरातच शेअर्सनी गुंतवणुकदारांचे पैसे जवळपास दुप्पट केले आहेत. गुंतवणूकदारांना थोडा थोडका नाहीतर तब्बल 110 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. 2020 पासूनचा कोरोना कालावधी बघितला तर या टाटाच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांचं नशीब बदलण्याचं काम केलं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 


आज जी कंपनी नफा कमावतेय, एकेकाळी तीच कंपनी होती गाशा गुंडाळण्याच्या तयारीत 


कदाचित तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण कधीकाळी टाटा समुहाची नामांकीत कंपनी टाटा मोटर्स गाशा गुंडाळण्याच्या तयारीत होती. रतन टाटा (Ratan Tata) यांची ही कंपनी एकेकाळी इतकी अडचणीत आली होती की, टाटांनी तिला विकण्याचा प्लॅनही तयार केला होता. कंपनी विकण्यासाठी तत्कालीन आघाडीची वाहन कंपनी फोर्ड मोटर्ससोबतचा (Ford Motors) करार जवळपास निश्चित झाला होता. पण अगदी शेवटच्या क्षणी करार मोडला. रतन टाटा यांनी 90 च्या दशकात सतत वाढत असलेल्या तोट्यामुळे प्रवासी कार विभाग विकण्याचा निर्णय घेतला होता आणि यासाठी फोर्ड मोटर्सशी बोलणी सुरू होती. पण भेटीदरम्यान फोर्डचे चेअरमन बिल फोर्ड (Bill Ford) यांनी त्यांना एक गोष्ट सांगितली आणि करार मोडला. बिल फोर्ड यांनी सांगितलेली गोष्ट रतन टाटा अद्याप विसरलेले नाहीत आणि आज फोर्डचे मोठे ब्रँड्स त्यांनी स्वतःच्या नावे केले आहेत.  


इथे करार मोडला अन् तिथे कंपनीची यशस्वी वाटचाल सुरू झाली 


टाटा मोटर्स विकण्याचा निर्णय रतन टाटांनी का बदलला? यासंदर्भात एक किस्सा सांगितला जातो. अमेरिकेत मीटिंग दरम्यान बिल फोर्ड यांनी रतन टाटांची चेष्ठा केली होती. ते म्हणाले होते की, तुम्हाला काही कळतच नव्हतं, तर मग तुम्ही प्रवासी कार विभागच का सुरू केला? जर आम्ही तुमचा हा व्यवसाय विकत घेतला, तर ते तुमच्यावर उपकार होतील. यानंतर रतन टाटांनी फोर्ड मोटरसोबतचा करार मोडला. त्यादिवसापासून पुढच्या 9 वर्षांतच टाटांनी टाटा मोटर्स अशा उंचीवर नेवून ठेवली की, दिवाळखोरीच्या मार्गावर असलेल्या फोर्ड मोटर्सचे जॅग्वार आणि लँड रोव्हर ब्रँड विकत घेण्याची ऑफर दिली. 


याबाबत रतन टाटा आणि बिल फोर्ड पुन्हा आमनेसामने आले, मात्र यावेळी परिस्थिती वेगळी होती. फोर्डच्या अध्यक्षांचा सूर बदलला होता. त्यांनी या ऑफरसाठी रतन टाटा यांचे आभार मानले आणि म्हणाले की, तुम्ही जॅग्वार-लँड रोव्हर (JLR) खरेदी करून आमच्यावर मोठा उपकार करत आहात. 


एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट 


आता आपण टाटा मोटर्स शेअरचे मल्टीबॅगर रिटर्न पाहू, ज्यानं गेल्या 12 महिन्यांत 110 टक्के आणि गेल्या पाच वर्षांत 470 टक्के परतावा दिला आहे. टाटा समूहाचा हा मल्टीबॅगर स्टॉक 2020 पासून देशात कोरोना महामारीच्या काळात झपाट्यानं वाढला. 3 एप्रिल 2020 रोजी टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत फक्त 65.20 रुपये होती, जी सोमवार, 19 फेब्रुवारी 2024 रोजी शेअर बाजारातील व्यवहाराच्या शेवटी 933.80 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच या काळात त्यात गुंतवलेली रक्कम एक-दोन नव्हे तर जवळपास 15 पटीनं वाढली आहे. जेएम फायनान्शियलने या शेअरची लक्ष्य किंमत 1000 रुपये ठेवली आहे. 


कंपनी सातत्यानं नफ्यात 


Tata Motors चे मार्केट कॅपिटलायजेशन (Tata Motors MCap) 3.41 लाख कोटी रुपये आहे. कंपनीनं अलिकडेच डिसेंबर 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते, जे उत्कृष्ट होते. टाटा कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 137 टक्क्यांनी वाढून 7,025 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ते 2,958 कोटी रुपये होते. जर आपण महसुलाबद्दल बोललो तर, कंपनीच्या म्हणण्यानुसार, टाटा मोटर्सचा महसूल तिसऱ्या तिमाहीत 25 टक्क्यांनी वाढून 1,10,577 कोटी रुपये झाला, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 88,488 कोटी रुपये होता.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


एक मिनिटांत कोट्यवधी, एका आठवड्यात अब्जावधी; एलन मस्क कमाईत अंबानी-अदानींनाही टाकतात मागे!


Car loan Information:

Calculate Car Loan EMI