मुंबई : भारतातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) याचं बुधवारी रात्री निधन झालं. रतन टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनानं संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.  रतन टाटा यांनी जगासह संपूर्ण भारतावर करोनाचं संकट आलेलं तेव्हा पहिल्या लाटेत 1500 कोटी रुपयांची मदत करण्याची घोषणा केली होती. टाटा फक्त घोषणा करुन थांबले नाहीत तर त्यांनी केलेलं मदत कार्य दिसून आलं. मार्च 2021 पर्यंत टाटा ग्रुपनं 2500 कोटी रुपयांचा खर्च केला होता. 


रतन टाटा करोना संकटावर काय म्हणालेले?


करोना विषाणूचं संकट सर्वात कठीण आव्हानासारखं आहे. टाटा समुहाच्या कंपन्या नेहमी अशा गरजेच्या वेळी देशाच्या सोबत उभ्या राहिल्या आहेत.यावेळी देशाला आपली जास्त गरज आहे, असं रतन टाटा म्हणाले होते. देशावर ज्यावेळी करोनाचं संकट आलं तेव्हा रतन टाटा आणि टाटा ग्रुपनं वर्षभरात 2500 कोटी खर्च केले.


रतन टाटा यांच्या टाटा ग्रुपकडून करोनाच्या पहिल्या लाटेत 1500 कोटी रुपयांची घोषणा केली होती. पीएम केअर फंडमध्ये टाटा ग्रुपनं 500 कोटी रुपये दान केले होते. तर, एक हजार कोटी रुपये टाटांच्या कंपन्यांकडून प्रत्यक्ष खर्च करण्यात आलं होते. करोनाच्या संकटाच्या काळात गरिबांना जेवण देण्यात आलं, करोनाचा प्रसार होऊ नये म्हणून मास्क वाटप देखील करण्यात आलं होतं. टाटा ग्रुपच्या कंपन्या जिथं होत्या तिथं मदत कार्य करण्यात आलं होतं.


करोनाच्या संकटाच्या काळात टाटा ग्रुप ऑफ हॉटेल्सच्या सात मोठ्या हॉटेल्समध्ये कोविड वॉरिअर्स साठी राहण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. मुंबईतील ताज हॉटेलमध्ये जेवण बनवून मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी यांच्यासह रुग्णांना मोफत देण्यात होते. 


करोनाच्या पहिल्या लाटेत टाटा ग्रुपनं 1500 कोटी रुपये खर्च करण्याची घोषणा केली होती. मात्र, पुढील वर्षभर करोनाचा प्रभाव राहिल्यानं  टाटा ग्रुपच्या कंपन्यांनी आणखी एक हजार कोटी असे एकूण 2500 कोटी रुपये मार्च 2021 पर्यंत खर्च केले होते.  


रुग्णालयांमध्ये अतिरिक्त 3300 बेडची व्यवस्था करणं, नव्या दोन रुग्णालयांची उभारणी करणे, प्रतिदिन 1100 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती अशी कामं टाटा ग्रुपकडून करण्यात आली होती. 


रतन टाटा यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन एनसीपीए येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सर्वसामान्यांना सकाळी 10 ते 4 दरम्यान अंत्यदर्शन घेता येईल. दुपारी 4 नंतर रतन टाटा यांच्या पार्थिवावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.


इतर बातम्या :


Ratan Tata: दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेल बाहेर चणे-फुटाणे विकणारे जखमी झाले; प्रत्येकाला शोधून शोधून रतन टाटांनी केली मदत