Rakesh Jhunjhunwala Last Deal: भारतीय शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या निधनानंतर RARE Enterprises या त्यांच्या कंपनीने त्यांनी घेतलेल्या शेवटच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala Last Investment) यांच्या कंपनीने आज मंगळवारी बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा Singer India कंपनीत 10 टक्के खरेदी केले आहेत.
राकेश झुनझुनवाला यांनी मागील आठवड्यात Singer India कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यापूर्वीच रविवारी 14 ऑगस्ट 2022 रोजी त्यांचे निधन झाले. सोमवारी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त शेअर बाजार बंद होता. मंगळवारी शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर Rare Enterprises ने सकाळीच Singer India मध्ये बल्क डीलमध्ये 10 टक्के शेअर खरेदी केले. त्यामुळे Singer India मध्ये गुंतवणूक करत Rare Enterprises ने राकेश झुनझुनवाला यांची शेवटची इच्छा पूर्ण केली. Singer India कंपनीही शिलाई मशीनचे उत्पादन करते. भारतासह जगातील इतर देशांमध्ये हा ब्रॅण्ड प्रसिद्ध आहे.
Rare Enterprises ने Singer India मध्ये 10 टक्के भागिदारी खरेदी केली आहे. Rare Enterprises ने बल्क डीलमध्ये व्यवहार केल्यानंतर शेअर दरात मोठी उसळण दिसून आली. या व्यवहारानंतर आज Singer India चा प्रति शेअर दर 69.15 रुपये इतका झाला. आज शेअर दरात अप्पर सर्किट लागला. शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजी शेअर दर 57.65 रुपयांवर बंद झाला.
राकेश झुनझुनवाला यांनी 1985 च्या सुमारास अवघ्या पाच हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यांना पहिला नफा 1986 च्या सुमारास मिळाला. पहिल्याच गुंतवणुकीत झुनझुनवाला यांनी जवळपास तीन पट नफा मिळवला होता, असे म्हटले जाते. झुनझुनवाला यांनी 'टाटा टी' चे पाच हजार शेअर्स 43 रुपयांच्या दराने खरेदी केले होते. हेच शेअर त्यांनी 143 रुपयांना विकले. त्यानंतरच्या पुढील तीन वर्षात त्यांनी जवळपास 20 लाख रुपये कमावले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. शेअर बाजारातील बिग बुल अशी ओळख त्यांना मिळाली होती.
दरम्यान, आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 400 अंकांची वाढ झाली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्ये 133अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.67 टक्क्यांची वाढ होऊन 59,863 तो अंकावर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 0.76 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,831 अंकावर पोहोचला. निफ्टी बँकच्या इंडेक्समध्येही आज 207 अंकांची वाढ होऊन तो 39,249 अंकांवर पोहोचला.