Rakesh Jhunjhunwala :  भारतीय शेअर बाजारातील 'बिग बुल' अशी ओळख असलेले राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala Passed Away) यांचे निधन झाले. राकेश झुनझुनवाला यांचा शेअर बाजारातील प्रवास हा एखाद्या दंतकथेप्रमाणे भासावा असा राहिला. अवघ्या पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून शेअर बाजारातील प्रवासाला सुरुवात करणाऱ्या झुनझुनवाला यांनी जवळपास 44 हजार कोटींचे साम्राज्य उभे केले. शेअर बाजारात राकेश झुनझुनवाला यांच्या हालचालींवर अनेकांचे लक्ष असायचे. 


राकेश झुनझुनवाला यांचा जन्म 5 जुलै 1960 रोजी झाला. मुंबईतील सिडनहॅम महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते चार्टर्ड अकाऊंटंटही झाले. महाविद्यालयीन जीवनापासून राकेश झुनझुनवाला यांचा ओढा शेअर बाजाराकडे होता. अवघ्या पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीने त्यांनी बाजारातील व्यवहाराला सुरुवात केली. राकेश झुनझुनवाला यांनी बाजारातील व्यवहाराला सुरुवात केली होती तेव्हा सेन्सेक्स निर्देशांक 150  अंकाच्या आसपास होता. सध्या सेन्सेक्स 60 हजार अंकांच्या आसपास व्यवहार करत आहे. 


शेअर बाजारात प्रवेश


राकेश झुनझुनवाला यांनी त्यांचे वडील आणि मित्रांना शेअर बाजाराबाबत चर्चा करताना ऐकले. वडिलांकडून त्यांनी शेअर बाजारातील व्यवहाराबाबत माहिती घेतली. शेअर बाजारातील गुंतवणूक करण्यासाठी दररोज वृत्तपत्र वाचणे आवश्यक असल्याचे त्यांच्या वडिलांनी सांगितले. राकेश झुनझुनवाला यांना मात्र वडिलांनी कोणतीही आर्थिक मदत देण्यास नकार दिला. मित्रांसह अभ्यास करून गुंतवणूक करण्याचा सल्ला त्यांनी दिला. राकेश झुनझुनवाला यांनी 1985 च्या सुमारास अवघ्या पाच हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यांना पहिला नफा 1986 च्या सुमारास मिळाला. पहिल्याच गुंतवणुकीत झुनझुनवाला यांनी जवळपास तीन पट नफा मिळवला होता, असे म्हटले जाते. झुनझुनवाला यांनी 'टाटा टी' चे पाच हजार शेअर्स 43 रुपयांच्या दराने खरेदी केले होते. हेच शेअर त्यांनी 143 रुपयांना विकले. त्यानंतरच्या पुढील तीन वर्षात त्यांनी जवळपास 20 लाख रुपये कमावले. 


शेअर बाजारातील 'बेअर ते बुल'


राकेश झुनझुनवाला हे सुरुवातीला 'बेअर' होते. शेअर बाजारात विक्रीचा सपाटा करणाऱ्यांना 'बेअर' म्हटले जाते. तर, खरेदी करणाऱ्यांना बुल म्हटले जाते. हर्षद मेहता घोटाळा समोर आल्यानंतर त्यांनी शॉर्ट सेलिंगच्या माध्यमातून मोठा नफा कमावला. त्यानंतर झुनझुनवाला हे 'बेअर'च्या ऐवजी 'बुल' झाले असल्याचे म्हटले जाते.


राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा यादेखील गुंतवणूकदार आहेत. राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांच्या नावाने Rare Enterprises ही ट्रेडिंग कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूक केली जाते. राकेश झुनझुनवाला हे सक्रिय गुंतवणूकदार असण्यासोबत एक यशस्वी उद्योजक-व्यावसायिक होते. झुनझुनवाला हे अॅपटेक लिमिटेड आणि हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष होते. प्राइम फोकस लिमिटेड, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस, बिलकेअर लिमिटेड, प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड, प्रोव्होग इंडिया लिमिटेड, कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड, इनोव्हासिंथ टेक्नॉलॉजीज लिमिटेड, मिड डे मल्टीमीडिया लिमिटेड, नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, विकाअर हॉटेल्स लिमिटेड आदी कंपन्याच्या संचालक मंडळावर ते होते. 


राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांची टायटन कंपनीमध्ये 5.5 टक्के भागीदारी होती.  झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोमध्ये 26 जुलै 2022 मध्ये टायटनचे एकूण मूल्य अंदाजे 10 हजार 300 कोटींच्या आसपास होते. 'स्टार हेल्थ'मध्ये त्यांची 14.39 टक्के भागिदारी होती.  फोर्टीस हेल्थकेयरमध्ये 4.23 टक्के, कॅनरा बँकेत 1.96 टक्के आणि क्रिसीलमध्ये 2.92 टक्के इतकी त्यांची भागीदारी होती.