मुंबई : सध्या उन्हाळी सुट्ट्या (Holidays) सुरु आहेत. अशा वेळी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बहुतेक लोक रेल्वे (Railway) हा सोपा, सुखकर आणि खिशाला परवडणारा असा पर्याय निवडतात. पण उन्हाळ्याची सुटटी असो किंवा सण-उत्सवांचा पिक सीझन यावेळी रेल्वेचं कन्फर्म तिकीट (Railway Confirm Ticket) मिळवण्यासाठी जणू नशीबचं लागतं. कन्फर्म तिकीटसाठी लोक दोन-तीन महिने आधी बुकींग करतात. पण, याच पिक सीझनमध्ये ट्रॅव्हल एजंट्सना लगेचच कन्फर्म तिकीट मिळते, हे तुम्ही पाहिलं असेल. पण, हे कसं होतं. ट्रॅव्हल एजंट्सना कन्फर्म तिकिट कशी मिळते, त्यांच्यासाठी खास कोटा असतो का, याबाबत सविस्तर जाणून घ्या.


ट्रेन तिकिटासाठी दोन-तीन महिन्यांची वेटिंग लिस्ट


रेल्वे तिकिटांची वेटिंग लिस्ट दोन-तीन महिने आधीपासूनच असते. अशा परिस्थितीत, लाखो प्रवासी कन्फर्म तिकिटांसाठी ट्रॅव्हल एजंटकडे जातात किंवा तात्काळ कोट्यातून बुकिंग करतात. पण, तात्काळ सुट्ट्यांच्या सीझनमध्ये तिकिटं मिळवणं इतकं सोपं नाही कारण तिकिटे अगदी काही मिनिटांतच विकली जातात. अशा वेळी तिकिटांसाठी एजंटकडे जाणे हाच एकमेव पर्याय लोकांसमोर उरतो. गाड्यांची वेटिंग लिस्ट असताना एजंटना कन्फर्म तिकिटे कशी मिळतात, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्याचं उत्तर जाणून घ्या.


एजंट्स तुम्हाला कंन्फर्म तिकीट कसं देतात?


ट्रॅव्हल एजंटना काही विशेष कोटा मिळतो का किंवा त्यांना विशेष लॉगिन सुविधा मिळतात किंवा ते तिकीट बुकिंगसाठी काही खास युक्त्या वापरतात का? मात्र, सर्वसामान्यांच्या या सर्व कल्पना चुकीच्या आहेत. ट्रॅव्हल एजंट किंवा दलाल प्रवाशांना कन्फर्म तिकिटे कशी देतात ते आम्ही तुम्हाला सांगतो.


खास कोटा नाही, एजंटची चलाखी


ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी ट्रॅव्हल एजंट सणासुदीच्या दोन-तीन महिने आधी सक्रिय होतात. रेल्वेचे तिकीट एजंट्स वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या ट्रेनचे तिकीट बुक करतात. ही तिकिटे 15 ते 45 वयोगटातील लोकांच्या वेगवेगळ्या नावाने बुक केली जातात. 15 वर्षे ते 45 वर्षे किंवा त्याहून थोडे अधिक वयोगटातील प्रवासी सापडण्याची शक्यता असते.


एकाचे तिकीट, प्रवास दुसऱ्याचा


कन्फर्म तिकिटे देण्यासाठी एजंट्स हीच युक्ती करतात. म्हणजे तुम्हाला मिळणारे तिकीट दुसऱ्याच्या नावावर आहे. मात्र, एजंट तुम्हाला सांगतात की, टीटीई तुमच्याकडून आयडी वगैरे मागणार नाही, यादीत नाव पाहूनच पुढे जाईल, असं सांगून एजंट तुम्हाला तिकीट देतो. पण, अनेक वेळी किंवा शंका असल्यास, TTE तुमच्याकडून ID मागू शकतो. आयडीवर छापलेली माहिती आणि तिकीट जुळत नसेल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.


जर ब्रोकरने तुम्हाला असे कन्फर्म तिकीट दिले तर, तुमची सीट प्रवासाच्या मधेच तुमच्याकडून जाण्याची शक्यता असते. ज्या तिकिटासाठी तुम्ही एजंटला आधीच दोन ते तीन पट रक्कम दिली आहे. त्यातच तुम्ही पकडले गेल्यास दंडासोबत नवीन तिकिटासाठी पैसे भरावे लागतील, कारण TTE दंड आकारेल. म्हणजेच 400 रुपयांच्या स्लीपर तिकिटासाठी तुम्हाला जवळजवळ 2000 रुपये मोजावे लागतील.


त्यामुळे दलालांकडून तिकीट खरेदी करताना नेहमी काळजी घ्या. काही वेळेस आपात्कालीन परिस्थितीत तुम्हाला अचानक प्रवास करावा लागला, तर जनरल किंवा वेटिंग तिकीट घेऊन प्रवास करा आणि तुम्ही TTE ला भेटून कन्फर्म सीटबद्दल बोलू शकता. दरम्यान, रेल्वे गाड्यांमधील कोचच्या उपलब्धतेनुसार हे शक्य आहे. ट्रेनमध्ये कोणतीही सीट रिक्त राहिल्यास टीटीई तुम्हाला ती सीट देऊ शकतो.