PVR Inox : पीव्हीआर-आयनॉक्स मल्टिप्लेक्स चेन ऑपरेटरला (PVR Inox Multiplex chain) मार्च अखेरच्या तिमाहीत 333 कोटींचा तोटा झाल्यानंतर आता कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून पुढील सहा महिन्यात 50 सिनेमा स्क्रिन्स बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पीव्हीआर-आयनॉक्स मल्टिप्लेक्स कंपनीचे तिमाहीचे आकडे जाहीर करताना ही माहिती देण्यात आली. 


या 50 स्क्रिन्स बंद करण्याचा निर्णय घेतल्यांतर कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. या स्क्रीन्स तोट्यात चालतायत किंवा मॉल्समधील आहेत, ज्या जीवन चक्राच्या शेवटच्या टप्प्यावर आहेत आणि ज्या स्क्रीन्स पुनर्रुजिवित होण्याची शक्यता कमी आहेत त्या बंद करण्यात येणार आहेत.  


मागील आर्थिक वर्षात पीव्हीआर आणि आयनॉक्सनं एकत्रितपणे 30 सिनेमागृहांमध्ये 168 नव्या स्क्रिन्स उभारल्या होत्या. यंदाच्या आर्थिक वर्षात 150-175 स्क्रिन्स उघडण्याचे लक्ष्य असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. 


पीव्हीआर आणि आयनॉक्समधील विलीनीकरण मार्च अखेरच्या तिमाहीत यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे. त्यामुळे आधी पीव्हीआर लिमिटेड या नावाने ओळखली जाणारी ही कंपनी आता पीव्हीआर-आयनॉक्स लिमिटेड या नावाने ओळखली जाते. 


कोरोनामुळे चित्रपटगृह बंद असल्याने अनेक कंपन्यांना मागील मोठा फटका वर्षात बसला होता. त्यामुळे अनेक सिंगल स्क्रीन्स थिएटर बंद करण्यात आले होते. कोरोनामध्ये बसलेल्या आर्थिक फटक्यामुळे या दोन्ही कंपन्यानी विलीनीकरणाचा निर्णय घेतला होता. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम सारखे ओटीटी प्लॅटफॉर्म स्पर्धेत उतरले. या सगळ्याचा PVR INOX ला चांगलाच फटका बसत होते. त्यामुळेच या कंपन्यांनी विलीनीकरणाचा निर्णय घेतला होता.


पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेडला 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत 333.99 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ तोटा झाला आहे. पीव्हीआर आयनॉक्सने एका निवेदनात ही माहिती दिली. एका वर्षापूर्वी जानेवारी ते मार्च या कालावधीत कंपनीला 105.49 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.


चौथ्या तिमाहीत कंपनीच्या कामकाजातून मिळणारा महसूल दुपटीने वाढून 1,143 कोटी इतका झाला. मागील वर्षीच्या तिमाहीत तो 536 कोटी रुपये इतका होता. मार्च 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत PVR Limited आणि Inox Leisure या दोन आघाडीच्या सिनेमा प्रदर्शकांनी PVR INOX लिमिटेड ही नवीन ओळख बनवण्यासाठी विलीन केले.  पीव्हीआर आयनॉक्सचा आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत एकूण खर्च 1,364.11 कोटी रुपये होता. मार्च तिमाहीत त्याचे एकूण उत्पन्न 1,164.92 कोटी रुपये होते.


PVR INOX चा स्क्रीन पोर्टफोलिओ भारत आणि श्रीलंकेतील 115 शहरांमधील 361 सिनेमागृहांमध्ये 1,689 स्क्रीनवर आहे.