Dairy Business : शेतीला जोडव्यवसाय म्हणून अनेकजण दुग्धव्यवसाय (Dairy Business) करतात. दुग्धव्यवसाय हा चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. अलीकडच्या काळात अनेक तरुण दुग्ध व्यवसाय करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, तुम्हाला कमी चारा खाऊन जास्त दूध देणारी गाय कोणती हे माहित आहे का? तर साहिवाल ही कमी चाऱ्यात अधिक दूध देणारी गाय आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यात साहीवाल गायी पाळल्या जातात. 


साहीवाल गायीच्या दुधाचं वेगळं पॅकींग केलं जाणार


आज पंजाबमध्ये साहिवाल गायी मोठ्या प्रमाणात पाळल्या जात आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे कमी चारा खाऊनही ते जास्त दूध देतात. साहिवाल जातीच्या गायीच्या दुधात भरपूर प्रथिने असतात. ज्यामुळं अनेक प्रकारच्या आजारांपासून संरक्षण मिळते. त्यामुळं शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त साहिवाल गायी पाळल्या पाहिजेत. जेणेकरून साहिवाल गाईचे दूध मोठ्या प्रमाणात तयार करता येईल. दरम्यान, साहिवाल गायीचे दूध मोठ्या प्रमाणात उत्पादीत केल्यामुळं हे दूध वेगळे पॅक केले जाण्याचा पंजाब सरकारचा उद्देश आहे. इतर कोणत्याही जातीच्या गायीच्या दुधात भेसळ न करता लोकांना त्यांच्या मागणीनुसार शुद्ध दूध मिळू शकणार आहे.


गायीची योग्य काळजी घेतल्यास दररोज 30 ते 40 लिटर दूध


पंजाबसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरियाणामध्ये साहिवाल गाय मोठ्या प्रमाणात आढळतात. या राज्यांतील शेतकऱ्यांमध्ये ही गाय सर्वाधिक लोकप्रिय आहे. ही गाय दररोज सरासरी 10 ते 15 लिटर दूध देते. मात्र या गायीची योग्य काळजी घेतल्यास ती दररोज 30 ते 40 लिटर दूध देऊ शकते. या गायीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती कमी जागेतही ठेवता येते. तिची जास्त काळजी घेण्याची गरज नसते.


पुढील 40 वर्षे दुग्धव्यवसायासाठी सर्वोच्च काळ 


पुढील 40 वर्षे दुग्धव्यवसायासाठी सर्वोच्च काळ असल्याचे मत भारतीय डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष आर एस सोधी यांनी व्यक्त केले. देशाच्या आर्थिक स्थितीत डेअरी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक जनावरे वाढवण्यासाठी, जनावरांची काळजी घेण्यासाठी, चांगला चारा देण्यासाठी आणि अधिक चांगल्या दर्जाचे दूध उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. दुधाचा दर्जा सुधारल्यास निर्यातही वाढेल, असे त्यांचे म्हणणे आहे.


महत्वाच्या बातम्या:


5 गायींपासून सुरुवात, आज 46 गायींचा गोठा; दुग्ध व्यवसायातून महिला महिन्याला कमावतेय 7 लाख रुपये