Property Rates: देशभरात मालमत्तेच्या किंमतीत (Property Rates) झपाट्यानं वाढ होत आहे. विशेषतः देशातील मोठ्या शहरांमध्ये या किंमतीत मोठी वाढ होत असल्याचं समोर आलं आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालातून ही माहिती मिळाली आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात देशातील प्रमुख शहरांमधील मालमत्तेच्या किंमतीत सुमारे 19 टक्क्यांची वाढ झाली आहे.
स्वतःचे घर किंवा मालमत्ता खरेदी करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. कारण म्हणजे देशात मालमत्तेच्या किंमतीत मोठी वाढ होताना दिसत आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार ही बाब समोर आली आहे. मॅजिकब्रिक्स प्रोपइंडेक्स अहवालातून ही माहिती मिळाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या तीन महिन्यांसाठीची ही माहिती आहे. अहवालानुसार, डिसेंबर तिमाहीत देशातील 13 प्रमुख शहरांमधील मालमत्तेच्या किमती वार्षिक आधारावर 18.8 टक्क्यांनी वाढल्या आहेत. याचा अर्थ डिसेंबर 2022 च्या तिमाहीच्या तुलनेत डिसेंबर 2023 च्या तिमाहीत किमती 18.8 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तिमाही आधारावर, मालमत्तेच्या किमती 3.97 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
सर्वाधिक किंमतीत वाढ कुठं?
अहवालात दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या तिमाहीत देशातील प्रमुख शहरांमध्ये गुरुग्राममध्ये किंमतींमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. गुरुग्राममधील मालमत्तेच्या किमती एका वर्षात 32.1 टक्क्यांनी वाढल्या आहेत. ग्रेटर नोएडा 31 टक्के वार्षिक वाढीसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि नोएडा 26.1 टक्के वार्षिक वाढीसह तिसऱ्या स्थानावर आहे. या कालावधीत, हैदराबादमधील मालमत्तेच्या किमती वार्षिक आधारावर 15.8 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
दर वाढल्यानं मागणीत झाली घट
डिसेंबरच्या तिमाहीत किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली असली तरी मागणीत समांतर वाढ झालेली नाही. अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत मालमत्तेची मागणी मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत केवळ 2 टक्क्यांनी वाढली आहे. त्रैमासिक आधारावर मागणीत मोठी घट झाली आहे. त्यानुसार मागणी 16.9 टक्क्यांनी घटली आहे. मागणीत घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे किंमतीत झालेली प्रचंड वाढ. अहवालात म्हटले आहे की, तिसऱ्या तिमाहीत प्रमुख शहरांमध्ये मालमत्तेच्या किमती वेगाने वाढल्या, त्यामुळे मागणीत मोठी घट झाली. डिसेंबर तिमाहीत निवासी मालमत्तेचा एकूण पुरवठा वर्षभरापूर्वीच्या तुलनेत 16.9 टक्क्यांनी घटला आहे. पुरवठ्यात वाढ केवळ मुंबई आणि हैदराबादमध्ये नोंदवण्यात आली. तिसऱ्या तिमाहीत या दोन शहरांमधील निवासी मालमत्तांचा पुरवठा अनुक्रमे 4.2 टक्के आणि 0.4 टक्क्यांनी वाढला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: