PM Modi : नुकताच अयोध्येत प्रभु श्रीराम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळा संपन्न झाला. मोठ्या उत्साहात हा सोहळा झाला. राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं सुरु आहेत. मोठमोठे प्रकल्प सुरु आहेत. अशातच आता अयोध्येतनंतर आणखी एका शहराचा विकास होणार आहे. उत्तर प्रदेशमधील बुलंदशहराच्या (Bulandshahr) विकासासाठी पंतप्रधान मोदी यांनी  19 हजार कोटी रुपयांची भेट दिली आहे. छोट्या ते मोठ्या कंपन्या बुलंदशहरमध्ये त्यांचे उत्पादन प्रकल्प आणत आहेत. बुलंदशहर औद्योगिक क्षेत्रात कंपन्यांची आवक झपाट्याने वाढली आहे. त्यामुळं काही वर्षातच बुलंदशहराचा चेहरा मोहरा देखील बदलणार आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (25 जानेवारी) उत्तर प्रदेशातील बुलंदशहरच्या विकासासाठी 19 हजार कोटी रुपयांची घोषणा केली.तसेच त्यांनी आज अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. ज्यामध्ये रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू, शहरी विकास आणि गृहनिर्माण यासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश होता. यामुळं बुलंदशहरच्या विकासाची गती तर वाढेलच पण एनसीआरची व्याप्ती वाढण्यासही मदत होणार आहे.


लाखो लोकांना रोजगाराच्या संधी मिळणार


नोएडा ते बुलंदशहर हे अंतर सुमारे 70 किमी आहे. बुलंदशहरला जोडण्यासाठी उत्तम रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा हे शहर दिल्ली-एनसीआरला जोडतील. जेवार विमानतळाच्या बांधकामामुळं बुलंदशहर आधीच चर्चेत आहे. आता पंतप्रधान मोदींच्या अनेक उत्कृष्ट विकास प्रकल्पांच्या घोषणेमुळं विकासाचा वेग वाढणार आहे. त्यामुळे या शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. तसेच या शहरात रियल इस्टेटसह लाखो लोकांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.  


या प्रकल्पांचे उद्घाटन


पंतप्रधान मोदींनी फ्रेट कॉरिडॉरवरील न्यू खुर्जा-न्यू रेवाडी दरम्यानच्या 173 किमी लांबीच्या दुहेरी रेल्वे लाईनच्या विद्युतीकरण विभागाचे उद्घाटन केले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदींनी या दोन स्थानकांवरुन मालगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.


मथुरा-पलवल विभाग आणि चिपियाना बुजुर्ग-दादरी विभागाला जोडणारी चौथी लाईनचेही पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले.


पंतप्रधानांनी अनेक रस्ते विकास प्रकल्पांचेही लोकार्पण केले. यामध्ये अलीगढ ते भादवास चौपदरीकरण, मेरठ ते कर्नाल सीमेचे रुंदीकरण आणि राष्ट्रीय महामार्गाच्या शामली-मुझफ्फरनगर विभागाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा समावेश आहे.


मोदी इंडियन ऑइलच्या तुंडला-गवारिया पाइपलाइनचे उद्घाटनही करणार आहेत. तसेच ग्रेटर नोएडामधील एकात्मिक औद्योगिक टाउनशिपचेही उद्घाटन होणार आहे. 


जमिनीच्या दरात होणार मोठी वाढ


पंतप्रधान मोदींनी दिलेल्या 19 हजार कोटींमुळं बुलंदशहराचा मोठा विकास होणार आहे. यामुळं रियल इस्टेट क्षेत्राला मोठी भरभराट येणार आहे. जेवर विमानतळाला जोडल्यामुळं येथील जमिनीची मागणी झपाट्याने वाढली आहे. आता 19,000 कोटी रुपये मिळाल्यानं रस्ते आणि रेल्वे संपर्क अधिक चांगला होईल. त्यामुळं झपाट्यानं विकास होणार आहे. बुलंदशहर विकास प्राधिकरण (बीडीए) देखील शहराच्या विकासावर भर देत आहे. बीडीएच्या कार्यक्षेत्रातील गावांचा झपाट्याने समावेश होत आहे. सुमारे 124 गावांचा समावेश करण्याची तयारी सुरु झाली आहे. मागील संचालक मंडळाच्या बैठकीत यावर एकमत झाल्यानंतर प्राधिकरणाने हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. बीकेडीएमध्ये सामील झाल्यानंतर या गावांचा झपाट्याने विकास होणार आहे. 


या भागात नियोजीत प्रकल्प आणले जातील. बुलंदशहरमध्ये सध्या जमिनीच्या किंमती झपाट्याने वाढल्या आहेत. आता नवीन प्रकल्प येत आहेत. यामुळं येथे राहणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगारही उपलब्ध होणार आहे. रिअल इस्टेटमुळं मोठ्या संख्येनं लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.


नवीन उद्योग येणार, रोजगार वाढणार


बुलंदशहर हे एक प्रकारे एनसीआरचा भाग बनल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळं छोट्या ते मोठ्या कंपन्या बुलंदशहरमध्ये त्यांचे उत्पादन प्रकल्प आणत आहेत. बुलंदशहर औद्योगिक क्षेत्रात कंपन्यांची आवक झपाट्याने वाढली आहे. स्टील, मेटल क्राफ्ट, मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, पेंट्स, केमिकल्स, सिरॅमिक्स इत्यादींचे उत्पादन करणार्‍या कंपन्या इथल्या औद्योगिक क्षेत्रात आधीच कार्यरत आहेत. यामध्ये हजारो लोकांना रोजगार मिळत आहे. आता जेवर विमानतळ जवळ आल्याने अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्याही येथे ये-जा करतील. या कंपन्या आपली व्याप्ती वाढवतील. त्यामुळं या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत.