Gold Prices record News : दिवसेंदिवस सोन्याच्या दरात (Gold Prices) विक्रमी वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करणं महाग झालं आहे. सर्वसमान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्यात सोन्याच्या दरात तब्बल 7 टक्क्यांची वाढ झालीय. याचा मोठा फटका खरेदीदारांना बसत आहे.
सोन्याच्या दरात पुन्हा एकदा विक्रमी वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारात दर 74 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर गेले आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने प्रति औंस 2,450 डॉलरची पातळी ओलांडली आहे. मध्यपूर्वेतील भू-राजकीय तणावामुळे सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात यूएसच्या चलनवाढीच्या आकडेवारीनंतर, यूएस फेडरल रिझर्व्ह आपल्या सप्टेंबरच्या बैठकीत व्याजदरात कपात करण्यास सुरुवात करेल अशी शक्यता वाढली आहे. आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की एप्रिलमध्ये अमेरिकेतील महागाईचा दर अपेक्षेपेक्षा कमी होता. तसेच विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून सुरू असलेली सोन्याची खरेदी आणि चीनमधून येणारी प्रचंड भौतिक मागणी यामुळे किमतींना सातत्याने पाठबळ मिळत आहे.
देशांतर्गत स्पॉट मार्केट
जागतिक बाजारातील मजबूत ट्रेंडच्या आधारे मंगळवारी देशांतर्गत स्पॉट बाजारात सोन्याच्या दराने उच्चांक गाठला. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या मते, 24 कॅरेट (999) सोन्याचा भाव आज 839 रुपयांनी वधारुन 74,222 रुपये प्रति 10 ग्रॅमचा नवीन उच्चांक गाठला. तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, किंमती सुमारे 70 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम (71,191 रुपये - 3 मे 2024) पर्यंत घसरल्या. अशाप्रकारे पाहिल्यास देशांतर्गत स्पॉट मार्केटमध्येही सोन्याचे भाव मे महिन्याच्या नीचांकी पातळीपासून 4 टक्क्यांहून अधिक मजबूत झाले आहेत. यापूर्वी, 19 एप्रिल 2024 रोजी देशांतर्गत स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचा भाव 24 कॅरेटने (999) वाढून 73,958 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका उच्चांक गाठला होता.
एमसीएक्सवर सोन्याचा दर किती?
देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याच्या किमतीने एमसीएक्सवर विक्रमी पातळी गाठली आहे. बेंचमार्क जून फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट इंट्राडे ट्रेडिंगमध्ये 74,442 रुपये प्रति 10 ग्रॅम या नवीन सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंमती सुमारे 70 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरल्या (रु. 70,082 - 3 मे 2024). अशाप्रकारे पाहिले तर देशांतर्गत वायदे बाजारातही सोन्याचे भाव मे महिन्याच्या नीचांकी पातळीपासून ६ टक्क्यांहून अधिक मजबूत झाले आहेत. याआधी देशांतर्गत फ्युचर्स मार्केटमध्ये, MCX वर बेंचमार्क जून फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट 12 एप्रिल 2024 रोजी इंट्राडे ट्रेडिंगमध्ये 73,958 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत वाढला होता.
महत्वाच्या बातम्या: