Post Office Scheme : आपल्या उतारवयासाठी किंवा भविष्य सुखकर होण्यासाठी आपल्या कमाईतील काही भागाची बचत करतो. तसेच, गुंतवणूकीचे वेगळे पर्यायही निवडले जातात. गुंतवणूक करताना आपण गुंतवलेले पैसे सुरक्षित ठिकाणी गुंतवण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठी अनेक वेगवेगळे पर्याय निवडले जातात. जर तुम्हीही गुंतवणूक करण्याचा विचार करताय आणि त्यासाठी पर्याय शोधताय, तर पोस्ट ऑफिसच्या योजना (Post Office Schemes) तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरतील. पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणार्‍या छोट्या बचत योजना आता खूप लोकप्रिय ठरत आहेत. अशीच एक योजना पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना (Time Deposit Scheme). ज्यामध्ये गुंतवणूक केलेली रक्कम निश्चित वेळेत दुप्पट होते. यावरील व्याज देखील उत्कृष्ट आहे. या योजनेत उपलब्ध असलेल्या फायद्यांपासून ते खाते उघडण्यापर्यंतची संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेऊयात... 


7.5 टक्क्यांचं उत्कृष्ट व्याज


तुमच्या बचतीची सुरक्षितपणे गुंतवणूक करण्यासाठी आणि त्यावर चांगला परतावा मिळवण्यासाठी पोस्ट ऑफिस बचत योजना (Post Office Saving Schemes) हा एक उत्तम पर्याय आहे. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे, कारण ही योजना गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करणारी बचत योजना आहे. यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीवर बँकांपेक्षाही जास्त व्याज मिळतं. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना सरकार 7.5 टक्के दरानं व्याज देत आहे.


'या' कालावधीसाठी गुंतवणूक करा 


गुंतवणूकदार वेगवेगळ्या कालावधीसाठी पोस्ट ऑफिसच्या या बचत योजनेत गुंतवणूक करू शकतात. या अंतर्गत 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्षांसाठी पैसे जमा करता येतात. जर तुम्ही एका वर्षासाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला 6.9 टक्के व्याज मिळेल, तुम्ही 2 किंवा 3 वर्षांसाठी पैसे गुंतवल्यास तुम्हाला 7 टक्के व्याज मिळेल आणि पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीममध्ये (Time Deposit Scheme) 5 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास 7.5 टक्के व्याज मिळेल. मात्र, ग्राहकाची गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागतो.


पैसे दुप्पट व्हायला लागतील इतकी वर्ष 


एका उदाहरणातून समजून घेऊयात की, पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिटमध्‍ये गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट होण्‍यासाठी किती कालावधी लागतो. समजा एखाद्या ग्राहकानं 5 लाख रुपये पाच वर्षांसाठी गुंतवले आणि त्याला 7.5 टक्के दरानं व्याज मिळतं, तर या कालावधीत त्याला 2 लाख 24 हजार 974 रुपयांचा परतावा मिळेल आणि गुंतवणुकीच्या रकमेसह एकूण मॅच्युरिटी रक्कम 7,24,974 रुपयांपर्यंत वाढेल. जर टाईम डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवलेले पैसे 9.6 वर्षांसाठी गुंतवले तर तुम्हाला जमा केलेल्या रकमेच्या दुप्पट मिळेल. म्हणजेच, 114 दिवसांच्या गुंतवणुकीनंतर पैसे दुप्पट होतील.


तुम्हाला Tax सवलतीचाही मिळेल लाभ


टाईम डिपॉझिट (Time Deposit) स्कीममध्ये, ग्राहकाला आयकर विभाग कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील दिला जातो. या बचत योजनेत सिंगल अकाउंट किंवा जॉईंट अकाउंट उघडता येतं. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाचं खातं त्याच्या कुटुंबातील सदस्याद्वारे उघडता येतं. यामध्ये किमान 1 हजार रुपयांमध्ये खातं उघडता येतं. ज्यामध्ये व्याजाचे पैसे वार्षिक आधारावर जोडले जातात.