यवतमाळ:  राज्य सरकारचा शासन आपल्या दारी (Shasan Aplya Dari) हा कार्यक्रम आज यवतमाळ जिल्ह्यात पार पडत आहे. या कार्यक्रमसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपस्थित राहणार आहे. मात्र यवतमाळमध्ये (Yavatmal News) पार पडणाऱ्या कार्यक्रमावर  मराठा आंदोलकांच्या रोषाचे सावट आहे. मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्या गावबंदीच्या आवाहनानंतर यवतमाळमधील मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान मराठा संघटनाकडून विरोध होण्याची शक्यता आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या पोस्टरला अज्ञांताकडून  काळे फासण्यात आले आहे. पोस्टर नगरपालिकेकडून काढण्यात आले आहे.  या पार्श्वभूमीवर पोलीसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. 


शासन आपल्या दारी  या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यवतमाळ येथे पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे यवतमाळच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपस्थित राहणार नाही. देवेंद्र फडणवीस हे छत्तीसगडच्या रायपूर येथे निवडणूक प्रचाराला जाणार आहेत तर अजित पवार यांना डेंगू झाल्याने ते गैरहजर राहणार आहेत.  सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण विदर्भातून तीन हजार पोलीस तैनात करण्यात आले आहे. जागोजागी फिक्स पॉईंट लावण्यात आले. विमानतळ ते सभा या रस्त्यादरम्यान पोलिसांचा काल रात्रीपासून  चोख  बंदोबस्त लावण्यात आला आहे. सभास्थळी आत सोडताना तपासणी करूनच सोडण्यात येणार आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा गाजत आहे अशात हा कार्यक्रम होत आहे. यवतमाळच्या माहागाव, उमरखेड या भागात मराठा आंदोलक आक्रमक होताना दिसत आहे. तर शेतकऱ्यांचे ,बेरोजगारांचे प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.


जवळपास 35 हजार लाभार्थी उपस्थित राहण्याची शक्यता


 सर्वसामान्य नागरिकांना कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन राबवित असलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रम किन्ही या गावाजवळ आयोजित करण्यात आला. जवळपास 35 हजार लाभार्थी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यातील काही लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रत्यक्ष लाभाचे वितरण केले जाणार आहे. कार्यक्रमस्थळी रोजगार मेळाव्यासह विविध विभागांचे स्टॅाल राहणार आहे. या ठिकाणी लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती दिली जातील. कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी येण्याची आणि जाण्याची व्यवस्था शासनाच्यावतीने करण्यात आली आहे. सुरक्षा दृष्टीने संपूर्ण विदर्भातील 3 हजार पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.


मुख्यमंत्र्यांना बंदी घालण्याची शक्यता


मराठा आरक्षणाचं (Maratha Reservation) लोण राज्यभरात पसरत असताना आता आंदोलनाची धग तीव्र होतांना दिसत आहे. राज्यभरात सर्वपक्षीय राजकारणी आणि लोकप्रतिनिधींना जिल्हा बंदी आहे.  आमदार-खासदारांना फिरू न देण्याचा इशारा सकल मराठा मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे यवतमाळमध्ये मुख्यमंत्र्यांना बंदी घालण्याची शक्यता आहे.