PM Surya Ghar Scheme: केंद्र सरकारनं सर्वसामान्यांसाठी अभिनव योजना आखत, यातंर्गत सर्वसामान्यांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची तरतूद केली आहे. सरकारनं पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज (PM Surya Ghar Free Electricity Scheme) योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 1 कोटी कुटुंबांना लाभ दिला जाणार आहे. नव्या योजनेंतर्गत रूफटॉप सोलर सिस्टीम (Sunroof Solar System) बसवणाऱ्या लोकांना सब्सिडी दिली जाईल. या योजनेंतर्गत किमान 30 हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे.
पीएम सूर्य घर मोफत वीज योजना (Free Electricity Scheme) अंतर्गत, 1-किलोवॅट रूफटॉप सोलर सिस्टीम बसविणाऱ्या व्यक्तीला 30,000 रुपयांची सब्सिडी दिली जाईल. 2 kW ची सिस्टीम बसवणाऱ्यांना नवी सबसिडी 60,000 रुपये असेल, तर 3 kW रुफटॉप सोलर सिस्टीम बसवणाऱ्यांना 78,000 रुपयांची सब्सिडी मिळेल. या योजनेत तुम्हाला सब्सिडी कशी मिळेल? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. जाणून घेऊयात सविस्तर...
कशी मिळेल सब्सिडी?
- सर्वात आधी तुम्हाला पोर्टलवर नोंदणी करावी लागेल, त्यासाठी तुमचं राज्य आणि वीज वितरण कंपनी निवडा. यानंतर तुम्हाला तुमचा वीज ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ईमेल टाकावा लागेल.
- दुसऱ्या टप्प्यात, ग्राहक क्रमांक आणि मोबाईल क्रमांकासह लॉगइन करा आणि फॉर्मनुसार रूफटॉप सोलरसाठी अर्ज करा.
- तिसऱ्या टप्प्यात, जेव्हा तुम्हाला Feasibility Approval मंजूरी मिळेल, तेव्हा कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडून प्लांट स्थापित करा.
- इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, प्लांट तपशील सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करा.
- पुढील टप्प्यात, नेट मीटर बसवल्यानंतर आणि DISCOM द्वारे पडताळणी केल्यानंतर, पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार केले जाईल.
- शेवटच्या टप्प्यात, तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळाल्यावर, पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करा. तुम्हाला तुमच्या बँक खात्यात 30 दिवसांच्या आत सबसिडी मिळेल.
कुठे कराल नोंदणी?
तुम्हालाही केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर तुम्ही https://pmsuryaghar.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. या संकेतस्थळावर तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल. याशिवाय, जर तुम्हाला ऑफलाईन नोंदणी करायची असेल तर तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन नोंदणी करू शकता.
खर्च किती?
सरकारने माहिती दिली होती की, या योजनेअंतर्गत 1 कोटी कुटुंबांना लाभ दिला जाईल. ज्यांना त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनेल बसवावे लागतील. या संपूर्ण प्रकल्पाअंतर्गत सरकार एकूण 75,021 कोटी रुपये खर्च करणार आहे.