Petrol-Diesel Price Today : पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या वाढत्या किमतींमुळे हैराण झालेल्या जनतेसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग दहाव्या दिवशी कोणतीही वाढ झालेली नाही. गेल्या वेळी 6 एप्रिल रोजी दोन्हींच्या किमतीत वाढ करण्यात आली होती, त्यानंतर याच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली होती.
शनिवारी काय दर?
शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर नजर टाकली, तर महानगरांमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल दिल्लीत आहे, तर मुंबईत सर्वात महाग आहे. शनिवारी दिल्लीत पेट्रोलचा दर 105.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 96.67 रुपये प्रति लिटर इतका राहिला आहे. शनिवारी मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 120.51 रुपये तर डिझेलचा दर 104.77 रुपये प्रतिलिटर राहिला आहे. याशिवाय कोलकात्यात पेट्रोल 115.12 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.
सीएनजीचे दरही वाढले
या महिन्यात केवळ पेट्रोल आणि डिझेलच नाही तर सीएनजीच्या किमतीतही वाढ झाल्याने लोकांना चांगलाच त्रास झाला आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी सीएनजीच्या दरात किलोमागे अडीच रुपयांची वाढ झाली होती. या महिन्यातील सुमारे दोन आठवडे पाहिले तर सीएनजीच्या किमतीत 11.60 रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्लीत सध्या 1 किलो सीएनजीची किंमत 71.61 रुपये प्रति किलो आहे.
पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करणार का?
रशिया आणि युक्रेनमध्ये फेब्रुवारीपासून युद्ध सुरू झाले आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. सध्या कच्चे तेल प्रति बॅरल 130 डॉलरच्या वर पोहोचले आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 10 रुपयांची वाढ केली आहे. याचाच अर्थ सरकारने दिवाळीला दिलेला पाच रूपयांचा दिलासा मागे घेतला. परंतु, कच्चे तेल महागल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क सरकारने कमी केले नाही. इंधन दर वाढीमुळे घरगुती वापराच्या इतरही वस्तू महाग झाल्या आहेत. शिवाय गॅसच्या दरातही वाढ झाली आहे. आधीच कोरोनामुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला असताना आता वाढत्या महागाईने तो हैराण झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले तर महागाईला काही प्रमाणात आळा बसेल, असे जाणकारांचे मत आहे.