Lara Dutta Birthday: आज (16 एप्रिल) बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता (Lara Dutta) तिचा वाढदिवस आहे. लारा दत्ताचा जन्म 16 एप्रिल 1978 रोजी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे झाला. तिचे वडील एलके दत्ता पंजाबी आहेत, तर आई जेनिफर दत्ता अँग्लो इंडियन आहे. 1981 मध्ये दत्ता कुटुंब गाझियाबादहून बंगळुरूला स्थलांतरित झाले, त्यानंतर लारानी येथूनच तिचे शिक्षण पूर्ण केले. सौंदर्यवती अभिनेत्री लारा दत्ता अर्थशास्त्रात पदवीधर आहे.


2000मध्ये, लाराने ‘फेमिना मिस इंडिया’ स्पर्धेत भाग घेतला आणि ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला. त्याआधी 1997मध्ये ती ‘मिस इंटरकॉन्टिनेंटल’ म्हणून निवडली गेली होती. लारा दत्ताने 2003 मध्ये ‘अंदाज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पहिल्याच चित्रपटासाठी तिला पहिल्यांदा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले होते. यानंतर ती ‘मस्ती’, ‘खाकी’, ‘नो एंट्री’, ‘भागम भाग’, ‘पार्टनर’, ‘हाऊसफुल’, ‘डॉन’ अशा अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये दिसली. शेवट ती अक्षय कुमारच्या ‘बेलबॉटम’ या चित्रपटात दिसली होती.


पहिल्याच भेटीत महेशच्या प्रेमात पडली!


लारा दत्ताच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, तिने 16 फेब्रुवारी 2011 रोजी टेनिसपटू महेश भूपतीशी लग्न केले. लारा आणि महेशची पहिली भेट ही एक बिझनेस मीटिंग होती. पहिल्याच भेटीत लाराला महेशचा साधेपणा आवडला आणि ती त्याच्याकडे आकर्षित झाली. या भेटीतच दोघे मित्र बनले आणि एकमेकांना पसंत करू लागले.


पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन बांधली लग्नगाठ!


जेव्हा ते दोघे एकमेकांना डेट करत होते, तेव्हा महेश भूपतीचे लग्न झाले होते. त्याने मॉडेल श्वेता जयशंकरसोबत लग्न केले होते. लाराशी बंध जुळल्यावर महेशने श्वेताला घटस्फोट देऊन सात वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आणल्याचे सांगितले जाते. 2011 मध्ये, ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दोन दिवसांनी म्हणजेच 16 फेब्रुवारी 2011 रोजी दोघांनी मुंबईतील वांद्रे येथे लग्न केले. चार दिवसांनंतर 20 फेब्रुवारी 2011 रोजी दोघांनी गोव्यातील कँडोलिम बीचवर एका चर्चमध्ये लग्न केले. लग्नानंतर पुढच्या वर्षी 20 जानेवारी 2012 रोजी त्यांच्या घरी एका मुलीचा जन्म झाला, तिचे नाव त्यांनी सायरा भूपती ठेवले.


हेही वाचा :