Petrol Diesel Price :  देशामध्ये मागील वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून पेट्रोल, डिझेलच्या (Petrol Diesel Price) किंमतीत कोणताही बदल झाला नाही. मात्र, लवकरच ग्राहकांना दिलासा मिळू शकतो. अमेरिकेच्या एका निर्णयाने भारतीय इंधन कंपन्यांना दिलासा मिळणार आहे. भारतीय इंधन कंपन्या आता दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला या देशातून कच्चे तेल आयात करणार आहे. अमेरिेकेने व्हेनेझुएला या देशावर निर्बंध घातले होते. या निर्बंधात अमेरिकेने शिथिलता आणली आहे. त्यामुळे या लॅटिन अमेरिकन देशाकडून कच्चे तेल आयात करण्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला आहे. 


वृत्तसंस्थांन सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार,  रिलायन्स इंडस्ट्रीज व्हेनेझुएला येथून तीन टँकर बुक करत आहे ज्यांचा पुरवठा डिसेंबर आणि जानेवारी 2024 मध्ये केला जाईल. अमेरिकेने व्हेनेझुएलावर 2019 मध्ये निर्बंध लादले होते. या निर्बंधानंतर भारताने तेथून कच्च्या तेलाची आयात बंद केली होती. व्हेनेझुएलावर निर्बंध लादण्यापूर्वी रिलायन्स आणि नायरा एनर्जी नियमितपणे तिथून तेल खरेदी करत असत.


कमोडिटी मार्केट एनालिटिक्स फर्म Kpler च्या डेटानुसार, भारताने याआधी नोव्हेंबर 2020 मध्ये  कच्च्या तेलाची आयात केली होती. त्यानंतर आयात बंद आहे. 2019 मध्ये, व्हेनेझुएला हा भारताला पाचवा सर्वात मोठा पुरवठादार होता. त्या वर्षी भारताने तिथून 16 दशलक्ष टन कच्चे तेल आयात केले होते. 


व्हेनेझुएला हा जगातील पाचव्या क्रमांकाचा तेलसाठा


व्हेनेझुएला हा देश जगातील सर्वाधिक मोठा तेलसाठा असलेल्या देशांपैकी एक आहे. ऑक्टोबरमध्ये अमेरिकेने व्हेनेझुएलावर लादलेले निर्बंध शिथिल केले होते. व्हेनेझुएला आता सहा महिन्यांसाठी कोणत्याही मर्यादेशिवाय कच्च्या तेलाची निर्यात करू शकणार आहे. व्हेनेझुएला हा देश तेल निर्यातदार देशांची संघटना असलेल्या ओपेकचा सदस्य आहे.


रिलायन्स इंडस्ट्रीजकडून तीन सुपर टँकरची बुकिंग करण्यात आली आहे.यामधील प्रत्येक टँकरमध्ये जवळपास 2 लाख 70 हजार टन कच्चे तेल असणार आहे. दोन टँकर पुढील काही दिवसात भारतात दाखल होतील. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह यांनीदेखील भारत व्हेनेझुएलाकडून कमी दरात कच्चे तेल खरेदी करण्यास इच्छुक असल्याचे म्हटले होते. 


भारताकडून सर्वाधिक आयात


भारत हा जगातील कच्च्या तेलाचा सर्वात मोठा ग्राहक आहे. भारताली 85 टक्क्यांपेक्षा जास्त मागणी आयातीद्वारे पूर्ण केली जाते. गेल्या दोन वर्षांत कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड चढ-उतार झाले आहेत. युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतर कच्चे तेल प्रति बॅरल 139 डॉलरवर पोहोचले होते. दरम्यान, भारताला रशियाकडून कच्च्या तेलाची सवलत मिळत होती. पण, अलीकडच्या काळात त्यातही घट झाली आहे. शुक्रवारी, ब्रेंट क्रूड 2.45 टक्क्यांनी घसरण होऊन 78.88 डॉलरवर बंद झाले. तर, WTI क्रूडच्या दरातही 2.49 टक्क्यांची घसरण होऊन 74.07 डॉलरवर स्थिरावला. 


चीनचा फायदा


वृत्तानुसार, अमेरिकेने निर्बंध घातल्यानंतरही चिनी कंपन्यांनी व्हेनेझुएलाकडून मोठ्या प्रमाणावर सवलतीच्या दरात कच्च्या तेलाची खरेदी केली होती. आता, निर्बंध शिथील झाल्याने सवलतही कमी झाली आहे. व्हेनेझुएला आता इतर देशांनादेखील कच्च्या तेलाचा पुरवठा करणार आहे.