Petrol-Diesel Price : देशात आज पेट्रोल आणि डीझेलच्या किमतींमध्ये या महिन्यातील 4 तारखेनंतर आज चौदावी दरवाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलनं शंभरी गाठली आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 100 रुपये प्रति लिटर पोहोचला आहे. तर, राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमतीत 24 पैस प्रति लिटर आणि डीझेलची किंमत 29 पैसे प्रति लिटर वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, काल या किंमती स्थिर असल्याचं पाहायला मिळालं होतं. 


इंडियन ऑइलच्या वेबसाइटनं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पेट्रोल आज 100.4 रुपये आणि 91.87 रुपये प्रति लिटर आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 93.72 रुपये आणि डीझेल 87.46 रुपये आणि चेन्नईमध्ये पेट्रोल 95.28 रुपये आणि डीझेल 89.39 रुपये प्रति लिटर आहे. तसेच महाराष्ट्रातील परभणीतही पुन्हा एकदा पेट्रोल-डीझेलचा भडका उडाल्याचं पाहायला मिळालं आहे. आज पेट्रोल 23 पैसे तर डिझेल 30 पैश्यांनी महागले आहे. त्यामुळे परभणीत पेट्रोलचा दर 102.32 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर इतका आहे. 


काही शहरांमध्ये पेट्रोल आधीपासूनच शंभरीपार 


महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशसह अन्य काही शहरांमध्ये पेट्रोलनं 100 रुपये प्रति लिटरचा आकडा आधीच पार केला आहे. प्रीमियम पेट्रोलच्या किमती गेल्या काही महिन्यांपासून 100 रुपये प्रति लिटरपेक्षा अधिक झाल्या आहेत. मे महिन्यात आतापर्यंत 13 दिवसांनी दर बदलल्याचं पाहायला मिळालं आहे. मे महिन्यात झालेल्या 14व्या वाढीमुळे दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर 3.28 रुपयांची वाढ झाली आहे. तर डीझेलमध्ये 3.88 रुपये प्रति लिटरची वाढ झाली आहे. 


जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढून 69 डॉलर प्रति बॅरल झाली आहे. ओएमसीला आणखी काही काळ किंमतींमध्ये सुधारणा करावी लागू शकते. अमेरिकेचे निर्बंध कमी करण्यात उशीर झाल्यानंतर इराण तेलाच्या व्यापारात परत आला आहे. त्यामुळे जागतिक तेलाच्या किंमतीही स्थिर राहतील अशी अपेक्षा आहे.


दरम्यान, व्हॅट आणि फ्रेट शुल्कासारख्या स्थानिक करांमुळे इंधनाचे दर राज्यात वेगवेगळे असतात. राजस्थानमध्ये पेट्रोलवर सर्वाधिक व्हॅट आहे. त्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा क्रमांक येतो. तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या 15 दिवसांत प्रमाणित इंधनाची सरासरी किंमत आणि विनिमय दराच्या आधारे दररोज किंमती बदलल्या जातात.