Investment Tax Saving Tips: आर्थिक वर्ष 2022-23 संपण्यासाठी काहीच महिन्यांचा अवधी राहिला आहे. सर्व करदात्यांकडून कर वाचवण्यासाठी 31 मार्च 2023 पूर्वी गुंतवणूक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा स्थितीत गुंतवणूक कुठे करावी, कुठे गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकेल आणि कर वजावटीचा फायदा मिळेल, यासाठीच्या गुंतवणूक योजनांची माहिती घेतली जात आहे. ELSS किंवा ULIP मध्ये गुंतवणूक करणे हे जोखमीचे ठरू शकते. 


म्युच्युअल फंड आणि विमा कंपन्या या योजनांमध्ये जमा केलेले पैसे शेअर बाजारात गुंतवतात आणि तुम्हाला मिळणारा परतावा शेअर बाजाराच्या ट्रेंडवर अवलंबून असतो. अशा परिस्थितीत, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) कर वाचवण्यासाठी आणि चांगला परतावा मिळवण्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. 


सरकारची योजना आहे पीपीएफ 


पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही सरकारी योजना असल्याने सरकार या गुंतवणुकीवर परताव्याची हमी देते. सरकार आर्थिक वर्षाच्या प्रत्येक तिमाहीपूर्वी पीपीएफवरील व्याजदर निश्चित करते. सध्या पीपीएफवर वार्षिक 7.1 टक्क्यांनी व्याज मिळत आहे. पण 2015-16 मध्ये PPF वर 8.7 टक्के व्याज मिळायचे. मात्र त्यानंतर पीपीएफच्या व्याजदरात सातत्याने कपात होत आहे. सध्या पीपीएफ गुंतवणूकदारांना व्याजदरात कपातीचा फटका सहन करावा लागला आहे. मात्र, असे असूनही गुंतवणूकदार कर वाचवण्यासाठी आणि चांगला परतावा मिळवण्यासाठी पीपीएफवर विश्वास ठेवतात. PPF मध्ये योजनेत गुंतवणूक करून तुम्ही करोडपतीदेखील बनू शकता. 


गुंतवणुकीवरही कर सवलतीचा लाभ


आयकर कायद्याच्या 80C कलमातंर्गत, वार्षिक 1.50 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कर वजावटीचा लाभ मिळू शकतो. एका आर्थिक वर्षात PPF मध्ये जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. जर तुम्ही PPF मध्ये 1.50 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक केल्यास तुम्हाला कर सवलत मिळू शकते. 


दीर्घकालीन गुंतवणूक ठरेल फायदेशीर


तुम्ही पीपीएफ खात्यात वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. ही गुंतवणूक मासिक, तिमाही किंवा वार्षिक आधारावर करू शकता. PPF खात्यात 15 वर्षे सतत गुंतवणूक करू शकतात. जर गुंतवणूकदाराला पैशाची गरज नसेल, तर तो 15 वर्षानंतर त्याच्या PPF खात्याची मुदत पाच वर्षांचा कालावधी आणखी वाढवू शकता. त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असतो. 


पीपीएफच्या गुंतवणुकीतून करोडपती कसे काय?


जर तुम्ही 25 वर्षांचे असाल आणि निवृत्तीच्या 60 व्या वर्षापर्यंत म्हणजेच पुढील 35 वर्षांपर्यंत पीपीएफ खात्यात वार्षिक 1.5 लाख रुपये गुंतवत असाल तर तुम्हाला एकूण 2.27 कोटी रुपये मिळतील. यामध्ये 52,50,000 रुपये तुमची गुंतवणूक असेल. ज्यावर 1,74,47,857 रुपये व्याज म्हणून मिळतील. यावर कोणताही कर भरावा लागणार नाही.