SBI Bank Account Pan Link : बँकेत खातं (Bank Account) असलेल्या प्रत्येकासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. सोशल मीडियावर दररोज कोणते न कोणते मेसेज व्हायरल होत असतात. त्यातील काही खरे असतात, तर काही खोटे असतात. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Social Media) एक मेसेज व्हायरल होत आहे. या व्हायरल मेसेजमध्ये सांगण्यात आलं आहे की, जर तुमचं बँक खातं (Bank Account) आणि पॅन कार्ड (Pan Card) लिंक नसेल तर, तुमचं खातं बंद होऊ शकतं, असा दावा केला जात आहे. तुम्हालाही असा मेसेज आला असेल, तर त्यावर विश्वास ठेवण्याआधी त्याची सत्यता तपासा.
पॅन कार्ड लिंक नसल्यास बँक अकाऊंट होईल बंद?
सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लिहिलं आहे की, जर तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) अकाऊंट असेल आणि तुमचं पॅन कार्ड लिंक केलेलं नसेल तर तुमचं अकाऊंट ब्लॉक करण्यात येईल. व्हायरल मेसेजमधील दाव्यांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याप्रकरणी पीआयबीने फॅक्ट चेकमध्ये गंभीर बाबी समोर आणल्या आहेत. या मेसेजवर विश्वास ठेवण्याआधी त्यामागचं सत्य जाणून घ्या.
व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?
पीआयबीच्या फॅक्ट चेकमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हा हॅकर्सचा गंडा घालण्याचा नवा प्रयत्न असल्याचं समोर आलं आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने याबाबत अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून माहिती दिली आहे. यामध्ये सांगण्यात आल आहे की, गेल्या काही दिवसांपासून स्टेट बँकेच्या नावाने फसवणूक करणारे नागरिकांना मेसेज पाठवत आहेत. जर ग्राहकांनी बँक खात्यात पॅन क्रमांक अपडेट केला नाही तर, तुमचं खातं ब्लॉक केलं जाईल, असे मेसेज पाठवले जात आहेत. यासोबतच काही जणांना कॉल किंवा कोणत्याही लिंकद्वारे पॅन माहिती अपडेट करण्यासं सांगितलं जात आहे. तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज आला तर त्यावर चुकूनही विश्वास ठेवू नका. हा मेसेज पूर्णपणे खोटा आणि बनावट आहे, असं सांगत प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.
फसवणुकीपासून स्वतःला सुरक्षित ठेवा
स्टेट बँक आपल्या ग्राहकांना नेहमी सावध करते की, बँक कोणालाही कॉल किंवा मेसेज करून त्यांच्या खात्याशी संबंधित माहिती अपडेट करण्याचा सल्ला देत नाही. बँक पॅन तपशील अपडेट करण्यास सांगणारी कोणतीही लिंक पाठवत नाही. हा सायबर गुन्हेगारांचा फसवणुकीचा प्रयत्न आहे. याद्वारे हॅकर्स तुम्हाला गंडा घालू शकतात. यासोबतच, भारतीय स्टेट बँकेने असंही सांगितलं आहे की, जर कोणी सायबर गुन्ह्याचा बळी ठरला तर अशा व्यक्ती सायबर क्राईम सेलमध्ये 1930 या क्रमांकावर किंवा रिपोर्ट phishing@sbi.co.in या ईमेलद्वारे तक्रार नोंदवू शकतात.
सावधगिरी बाळगा
दरम्यान, फक्त स्टेट बँकेच्या खातेदारांनाच नाही तर इतर कोणत्याही बँकेत अकाऊंट असलेल्य ग्राहकाला अशा प्रकारचा मेसेज किंवा फोन आल्यास त्याकडे दुर्लक्ष करा. या मेसेज आणि कॉलकडे दुर्लक्ष करा आणि त्यांना ब्लॉक करा. अशा मेसेजमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करून तुमची वैयक्तिक माहिती किंवा डेटा अपडेट करू नका. याद्वारे हॅकर्स तुमचा डेटा लीक करून तुम्हाला गंडा घालण्याचा किंवा तुमच्या माहितीचा गैरवापर करण्याची शक्यता असते, त्यामुळे सावधगिरी बाळगा.