Small Saving Schemes : NSC, PPF आणि सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana ) यांसारख्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत अर्थमंत्री या बचत योजनांवरील व्याजदर वाढवण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. वित्त मंत्रालय प्रत्येक तिमाही सुरू होण्यापूर्वी बचत योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेते. त्यामुळे एप्रिल, मे आणि जून या तिमाहीचा आढावा घेतल्यानंतर बचत योजनांवरील व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. 


आरबीआयने अलिकडेच रेपो रेट वाढवण्याची घोषणा केली आहे. आरबीआयच्या या घोषणेनंतर अनेक बँकांनी आपल्या ठेवींवरील व्याज वाढवण्यास सुरूवात केली आहे. आरबीआयने 4 मे रोजी रेपो रेटमध्ये 40 बेसिक पॉईंटची वाढ करून 4.40 टक्के केली आहे. त्यामुळे 1 जुलैपासून सरकार बचत योजनांवरील व्याजात वाढ करू शकते अशी शक्यता आहे. आरबीआय जूनमध्ये पतधोरण आढाव्याची घोषणा करेल, त्यावेळी पुन्हा रेपो दर वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत वित्त मंत्रालय चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीसाठी या बचत योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेईल. त्यावेळी या बचत योजनांसाठी उपलब्ध व्याजदरात वाढ करण्यात येईल. 
 
सध्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफवर 7.1 टक्के व्याद मिळते. एनएससी म्हणजेच राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेवर वार्षिक 6.8 टक्के व्याज आहे. सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 टक्के व्याज आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर 7.4 टक्के तर किसान विकास पत्र या योजनेवर 6.9 टक्के व्याज मिळत आहे. एका वर्षाच्या मुदत ठेव योजनेवर 5.5 टक्के व्याजदर मिळतो. तर एक ते पाच वर्षांच्या मुदत ठेवींवर 5.5 ते 6.7 टक्के व्याजदर दिला जात आहे. याबरोबरच पाच वर्षांच्या ठेव योजनेवर 5.8 टक्के व्याज दिले जाते. 


2020-21 च्या पहिल्या तिमाहीपासून छोट्या बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी अर्थ मंत्रालयाने एका अधिसूचनेत म्हटले आहे की, 1 एप्रिल 2022 पासून सुरू होणार्‍या आणि 30 जून 2022 रोजी चौथ्या तिमाहीसाठी 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी विविध लहान बचत योजनांवरील व्याजदर सध्या लागू असलेल्या दरांप्रमाणेच राहतील.