PPF Small Savings Scheme :  खासगी नोकरी करत असाल तर निवृत्तीनंतर (Retirement Plan) पेन्शन मिळत नाही. आता बहुतेक सरकारी नोकरी करणाऱ्या काही नोकरदारांनाही पेन्शन मिळत नाही. कारण, काही सरकारी नोकऱ्यांमधून पेन्शनची व्यवस्था नाहीशी झाली आहे. त्यामुळे प्रत्येक नोकरी करणारा निवृत्तीनंतर काय? असा विचार करतोच.. अशाच नोकरदारांसाठी आज आम्ही एका सरकारी योजनाबद्दल माहिती सांगणार आहोत. ज्यामध्ये निवृत्तीनंतर कोट्यवधी रुपये मिळणार आहेत. विशेष म्हणजे, मिळणाऱ्या या पैशावर कोणताही टॅक्स आकारला जात नाही. या सरकारी योजनेमुळे निवृत्तीनंतर सव्वा दोन कोटी रुपये मिळतील. जाणून घेऊयात त्या योजनेबद्दल (Utility News In Marathi)


या योजनेचं नाव पब्लिक प्रॉव्हिडंट फंड असे आहे. गेल्या दशकभरापासून ही सर्वात लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला टॅक्सही वाचवता येतो.  पती-पत्नी जर या योजनेचा लाभ घेत असेल तर निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम साडेचार कोटी रुपये इतकी असू शकते. त्याशिवाय 35 वर्षांपर्यंत पती पत्नी वर्षाला 93,600 रुपये (प्रत्येकी 46800) टॅक्स वाचवू शकतात. टॅक्स वाचवण्याची रक्कम 46800 इतकी असावी, जेव्हा इन्कम टॅक्सच्या कमाल स्लॅबनुसार गुंतवणूकदार पूर्ण 30 टक्के कर भरत असेल. पण जर गुंतवणूकदार आयकराच्या खालच्या स्लॅब अंतर्गत कर भरत असेल, तर त्यानुसार कर बचतीची रक्कमही त्यानुसार कमी होईल. 


पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund किंवा PPF) ही केंद्र सरकारची मागील काही वर्षांपासून सर्वात प्रसिद्ध योजना आहे. छोट्या बचत योजनेंमध्ये याची गणना केली जाते. या योजनेअंतर्गत तुम्ही पोस्ट ऑफिस अथवा कोणत्याही बँकेत खाते उघडू शकता.  PPF खात्यात तुम्ही वर्षाला (येथे आर्थिक वर्ष ग्रहित  धरले जाते, म्हणजेच एक एप्रिल ते 31 मार्च पर्यंतचा कालावधी ) कमीतकमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त एक लाख 50 हजार रुपये जमा करु शकता. याचं व्याज वर्षाच्या अखेरच्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये जमा होतं. जर तुम्ही एक एप्रिल रोजी दीड लाख रुपये जमा केले तर वर्षाच्या अखेरीस तुमच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त व्याज जमा होईल. पीपीएफ खात्यामधील रक्कमेवर सरकार 7.1 टक्के व्याज देतं. 


पीपीएफ योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे ही योजना सररकारच्या  EEE (exempt-exempt-exempt) योजनेत येते. याचा अर्थ प्रत्येक वर्षी जमा होणाऱ्या व्याजाच्या रक्कमेवर तुम्हाला कर सवलत मिळते. व्याजाच्या रक्कमेवर तुम्हाला कोणताही टॅक्स आकारला जात नाही. तसेच मॅच्युअर झाल्यानंतर मिळण्यारी एकूण रक्कमही टॅक्स फ्री असते. 


 निवृत्तीनंतर कोट्यधीश कसे व्हाल?
 समजा तुम्ही 25 व्या वर्षी PPF खात्यामध्ये एक एप्रिल रोजी जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा केली. सध्याच्या व्याजदरानुसार, वर्षाच्या अखेरीस तुमच्या खात्यावर व्याजाची रक्कम 10 हजार 650 रुपये जमा होईल. म्हणजेच पुढील आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या खात्यावरील रक्कम 1,60,650 रुपये होईल. तसेच दुसऱ्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही दीड लाख जमा केल्यानंतर तुमच्या खात्यावरील रक्कम  3,10,650 रुपये होईल. दीड लाखांऐवजी तुम्चाय खात्यावर असलेल्या एकूण रक्कमेवर तुम्हाला व्याज मिळेल. म्हणजेच दुसऱ्या वर्षी तुम्हाला 22 हजार 56 रुपये व्याज मिळेल. अशापद्धतीनं प्रत्येक वर्षी एक एप्रिल रोजी दीड लाख रुपये जमा करत असाल तर मॅच्युरिटीच्या 15 वर्षानंतर तुमच्या खात्यात 40 लाख 68 हजार 209 रुपये जमा होतील. यामध्ये तुमची गुंतवणूक 22 लाख 50 हजार असेल आणि व्याज 18 लाख 18 हजार 209 रुपये असेल. 


 यावेळी तुमचं वय 40 असेल... निवृत्तीला तुम्हाला आणखी खूप वेळ असेल. 15 वर्ष सलग रक्कम भरल्यानंतरच कोट्यधीश व्हायची सुरुवात होते.  पीपीएफ खातं मॅच्युअर होण्याआधी पाच वर्ष एक्सटेंड केलं. तर तुम्ही कितीही वेळा एक्सटेंड करु शकता. तुम्हाला पाच वर्षांपासाठी पीपीएफ खातं एक्सटेंड करायचं आहे. तसेच गुंतवणूक कायम ठेवायची आहे. म्हणजेच तुमचं वय 45 झाल्यानंतर तुमचं पीपीएफ खाते 20 वर्षाचं होईल. त्यावेळी तुमच्या खात्यामधील रक्कम 66 लाख 58 हजार 288 रुपये होतील. यामधील तुमची गुंतवणूक तीस लाख असेल आणि व्याज 36 लाख 58 हजार 288 रुपये असेल. 


 पाच वर्षानंतर तुम्ही पुन्हा खातं पाच वर्षासाठी एक्सटेंड करा... आणि गुंतवणूक करत राहा... आता वयाच्या 50 पर्यंत तुमच्या खात्यात एकू रक्कम एक कोटी 3 लाख 8 हजार 14 रुपये असतील. यामधील तुमची गुंतवणूक 37 लाख 50 हजार असेल आणि व्याजाची रक्कम 65 लाख 58 हजार 15 रुपये इतकी असेल.. त्यानंतर पाच वर्षांसाठी पुन्हा खातं एक्सटेंड करा... 


तुम्ही 55 वर्षाचे झाल्यानंतर तुमच्या खात्यात एक कोटी 54 लाख 50 हजार 910 रुपये असतील. त्यामधील गुंतवणूक 45 लाख रुपयांची असेल आणि व्याज 1,09,50,911 रुपये असेल... पुन्हा पाच वर्षांसाठी खातं एक्सटेंड करा. आणि गुंतवणूक सुरु ठेवा. म्हणजेच तुम्ही 60 वर्षाचं झाल्यानंतर तुमच्या खात्यात 2,26,97,857 रुपये असतील. यामधील तुमची गुंतवणूक 52 लाख 50 हजार रुपये असेल. तर व्याजाची रक्कम एक कोटी 74 लाख रुपये असेल. ही सर्व रक्कम टॅक्सफ्री असेल.