LIC Kanyadan Policy : मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच, एलआयसी (Life Insurance Corporation) ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी. एलआयसीकडून गुंतवणूकदारांसाठी नेहमीच आकर्षक योजना जाहीर केल्या जातात. अगदी नवजात बाळापासून ते प्रोढ आणि वयोवृद्धांपर्यंत एलआयसी विविध योजना गुंतवणूकदारांना देते. एलआयसीनं वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांमधून बचत करण्यासोबतच मोठा निधी उभारण्यात गुंतवणूकदारांना मदत होते. एलआयसीनं मुलींसाठीही अनेक योजना सुरू केल्या आहेत, ज्यामुळे मुलींच्या शिक्षणापासून ते त्यांच्या लग्नापर्यंतचा संपूर्ण ताण दूर होऊ शकतो. साधारणपणे भारतात मुल जन्माला येताच, लोक तिच्या शिक्षणाची आणि लग्नाची काळजी करू लागतात, मग ती मुलगी असो वा मुलगा. जर तुम्ही देखील या यादीत असाल तर तुम्हीही तुमच्या मुलीसाठी 'एलआयसी कन्यादान पॉलिसी' (LIC Kanyadan Policy) घेऊ शकता. या योजनेच्या मदतीनं मुलीच्या लग्नाची चिंता दूर होईल आणि अगदी धुमधडाक्यात तुम्ही तिचं लग्न करू शकता.  


मुलीच्या लग्नासाठी 27 लाखांचा निधी


एलआयसी कन्यादान पॉलिसी केवळ तुमच्या मुलीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी उत्तम आहे. यामुळे तुम्ही तुमच्या मुलीचं भविष्य सुरक्षित करता आणि त्यासोबतच तिच्या लग्नाच्या खर्चाची तरतूदही करता. या योजनेच्या नावावरुनच तुमच्या लक्षात आलं असेल की, नेमकी ही योजना काय आहे. जेव्हा मुलगी विवाहयोग्य होते, तेव्हा या योजनेमुळे तुम्ही मोठ्या प्रमाणात निधी उभा करु शकता. यासाठी तुम्हाला दररोज फक्त 121 रुपये जमा करायचे आहेत. म्हणजेच, प्रति महिना 3,600 रुपये जमा करावे लागतील. या गुंतवणुकीद्वारे, 25 वर्षांच्या पॉलिसीचा मॅच्युरिटी पिरियड पूर्ण झाल्यावर तुम्हाला 27 लाख रुपये एकरकमी मिळतील. 


योजनेचा मॅच्युरिटी पीरियड काय? 


'एलआयसी कन्यादान पॉलिसी' 13 ते 25 वर्षांच्या मॅच्युरिटी पीरियडसाठी घेतली जाऊ शकते. एकीकडे, दररोज 121 रुपयांची बचत करून, तुम्ही तुमच्या मुलीसाठी 27 लाख रुपये उभे करू शकता, तर दुसरीकडे, तुम्ही या योजनेत दररोज केवळ 75 रुपये बचत करून, म्हणजेच सुमारे 2250 रुपये दरमहा, नंतर मॅच्युरिटीवर तुम्हाला 14 लाख रुपये मिळतील. जर तुम्हाला गुंतवणुकीची रक्कम वाढवायची किंवा कमी करायची असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार, ती वाढवू किंवा कमी करू शकता आणि त्याच आधारावर तुम्हाला मॅच्युरिटीनंतर मिळणारी रक्कमही बदलेल. 


तुम्हाला कर सवलतीचाही मिळेल लाभ


मुलीसाठी बनवलेली ही योजना घेण्याच्या वयोमर्यादेविषयी सांगायचं तर, या योजनेत लाभार्थीच्या वडिलांचं वय किमान 30 वर्ष, तर मुलीचं वय किमान एक वर्ष असावं. या एलआयसी प्लॅनमध्ये प्रचंड निधी जमा करण्यासोबतच कर सवलती देखील उपलब्ध आहेत. LIC कन्यादान पॉलिसी आयकर कायदा 1961 च्या कलम 80C च्या कक्षेत येते, त्यामुळे प्रीमियम ठेवीदारांना 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सूट मिळू शकते.


एवढंच नाही तर मुदतपूर्तीच्या कालावधीपूर्वी पॉलिसीधारकाशी कोणतीही अनुचित घटना घडल्यास किंवा त्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाल्यास, अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांना 10 लाख रुपयांपर्यंतची मदत देण्याची तरतूद आहे. तसेच, कुटुंबातील लोकांना प्रीमियमसुद्धा भरावा लागणार नाही. पॉलिसीचा मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यावर, नॉमिनीला संपूर्ण 27 लाख रुपये दिले जातील.


पॉलिसी घेण्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक? 


'एलआयसी कन्यादान पॉलिसी' घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असेल. त्यासाठी तुमचं आधार कार्ड (Aadhaar Card) किंवा इतर ओळखपत्र, इनकम सर्टिफिकेट, रेसिडेंशियल प्रूफ, पासपोर्ट साईज फोटो, मुलीचं बर्थ सर्टिफिकेट द्यावं लागेल.