Fixed Deposits Interest Rate :  : बँकेत मुदत ठेव (FD)हा गुंतवणुकीचा सर्वात जुना आणि सुरक्षित मार्ग मानला जातो. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बहुतांश बँकांनी त्यांच्या एफडीवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. महागाईला अटकाव करण्यासाठी रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. त्याचा फायदा आता एफडी वरील व्याज दरात दिसून येत आहे. 


मात्र, बँकेतील मुदत ठेवीत लोकांना अपेक्षित व्याज दर मिळत नाही. मागील काही वर्षात बँकेतील व्याज दर अतिशय कमी आहे. वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी आणि मुदत ठेवीवर चांगला परतावा मिळवण्यासाठी स्‍मॉल फायनान्‍स बँकांमध्ये गुंतवणूक करू शकता. काही स्‍मॉल फायनान्‍स बँका ह्या सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या बँकांपेक्षा अधिक व्याज दर देत आहेत. 


सूर्योदय स्‍मॉल फायनान्‍स बँक  आपल्या ग्राहकांना बँकेवरील मुदत ठेवीवर चांगला व्याज परतावा देत आहे. जर तुम्ही तीन वर्षांसाठी मुदत ठेव ठेवल्यास तुम्हाला सात टक्के दराने परतावा मिळू शकतो. तर, 7 ते 14 दिवसांच्या मुदत ठेवीवर 3.25 टक्के व्याज दर आहे. बँकांनी आपल्या व्याज दरात 10 मार्च 2022 मध्ये बदल केला होता. 


उज्जीवन स्‍मॉल फायनान्‍स बँक आपल्या ग्राहकांना 990 दिवसांच्या मुदत ठेवीवर 7.15 टक्के व्याज दर देत आहे. बँकेने एक मे 2022 पासून नवीन व्याज दर लागू केला आहे. 


उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना 1001 दिवस ते 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर जवळपास 7.25 टक्के व्याजदर देत आहे. दुसरीकडे, 1000 दिवसांपर्यंतच्या मुदत ठेवीवर बँक ग्राहकांना 3 ते 6.9 टक्के व्याजदर देत आहे. बँकेने 9 मे 2022 रोजी नवीन व्याजदर लागू केले आहेत.


ESAF स्मॉल फायनान्स बँकेने अलीकडेच त्यांचे व्याजदर बदलले आहेत. बँककडून 2 ते 3 वर्षांच्या मुदत ठेवीवर 7.25 टक्के व्याजदर दिला आहे. त्यापेक्षा कमी कालावधीसाठी 4 ते 6.6 टक्के व्याजदर देत आहे.