Sukanya Samriddhi Yojana : घरात मुल जन्माला येताच त्याच्या पालकांना त्यांच्या भविष्याची चिंता जाणवू लागते. अशातच मुलगी असेल तर तिचं शिक्षण, तिचं लग्न अशा अनेक जबाबदाऱ्यांच्या चिंतेनं मन व्याकूळ होतं. पण, जर पालकांनी वेळीच आर्थिक नियोजन केलं, तर त्यांच्यासाठी भविष्यातील अनेक प्रश्न सुटतात. जर तुम्ही योग्य पद्धतीनं आर्थिक नियोजन केलं, तर तुमची मुलगी मोठी झाल्यावर तिच्याकडे मोठी रक्कम असेल, जेणेकरुन ती मोठी झाल्यावर तिचं कोणतंही काम थांबणार नाही. मुलींचं भविष्य सुधारण्याच्या उद्देशानं सरकारनं सुकन्या समृद्धी योजना (Know About Sukanya Samriddhi Yojana) आणली आहे. ही सरकारी हमी योजना आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, ही योजना फक्त मुलींसाठी राबवली जाते.
सुकन्या समृद्धी योजनेत (SSY) तुम्ही वार्षिक 250 ते 1.5 लाख रुपये जमा करू शकता. तुमच्या गुंतवणुकीनुसार कन्येसाठी भांडवल जमा होतं. सध्या या योजनेत 8.2 टक्के दरानं व्याज दिलं जात आहे. या दीर्घकालीन योजनेत तुम्हाला 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. ही योजना वयाच्या 21 व्या वर्षी मॅच्युअर होईल. जर तुमच्या मुलीचं वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल, तर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर सुकन्या समृद्धी योजनेचं खातं उघडू शकता आणि वयाच्या 21 व्या वर्षी तिला 70 लाख रुपयांची मालकीन बनवू शकता. कसं ते जाणून घ्या सविस्तर...
21 व्या वर्षीय तुमची मुलगी बनेल 'लखपती'
तुम्ही तुमच्या मुलीच्या नावानं सुकन्या समृद्धी खात्यात दरवर्षी 1.5 लाख रुपये जमा केल्यास, तुम्हाला गुंतवणुकीसाठी दरमहा 12,500 रुपये वाचवावे लागतील. तुम्ही 15 वर्षांत एकूण 22,50,000 रुपयांची गुंतवणूक कराल. सध्या या योजनेवर 8.2 टक्के व्याज आहे. 21 वर्षांच्या मुदतपूर्तीच्या वेळी, एकूण 46,77,578 रुपये व्याज म्हणून मिळतील. परिपक्वतेवर, मुलीला व्याज आणि गुंतवलेल्या रकमेसह एकूण 22,50,000 रुपये + 46,77,578 रुपये = 69,27,578 रुपये (सुमारे 70 लाख) मिळतील. ही रक्कम गुंतवलेल्या रकमेच्या तिप्पट आहे. अशाप्रकारे, जर तुम्ही तुमच्या मुलीच्या जन्माबरोबरच तिच्या नावावर या खात्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, तर वयाच्या 21 व्या वर्षी ती सुमारे 70 लाख रुपयांची मालकीन होईल.
जर वार्षिक 1 लाख गुंतवले तर...
जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी या योजनेत वार्षिक 1,00,000 रुपये गुंतवले तर तुम्हाला दरमहा 8,334 रुपये गुंतवावे लागतील. अशा परिस्थितीत, 15 वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक 15,00,000 रुपये होईल. 21 वर्षांनंतर तुम्हाला रिटर्नमध्ये 31,18,385 रुपये मिळतील. अशा प्रकारे, तुम्हाला गुंतवलेली रक्कम आणि व्याजाच्या रकमेसह एकूण 46,18,385 रुपये मिळतील.
यावर्षीपासून सुरुवात केली तर, पैसे कधी मिळणार?
जर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावानं 2024 मध्ये सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर ही योजना 2045 मध्ये परिपक्व होईल, म्हणजेच तुम्हाला या योजनेचे संपूर्ण पैसे 2024 पर्यंत मिळतील. सुकन्या समृद्धी योजनेचा एक मोठा फायदा म्हणजे, गुंतवणूकदार आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर वाचवू शकतात. एसएसवाय खातं कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेत उघडता येतं.
(वर देण्यात आलेली पोस्ट ऑफिसच्या योजनेची माहिती आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)