How To Save Money : पगार तसा चांगला आहे पण बचत काही होत नाही, अशी तक्रार अनेकजण करतात. अशी तक्रार करणाऱ्यांमध्ये नोकरदार वर्गातील व्यक्तींची संख्या अधिक असते. खर्च आणि अनावश्यक खर्च यामध्ये अनेकजण फरक करू शकत नाहीत. त्यामुळे हा महिनाखेरपर्यंत हातात काहीच रक्कम शिल्लक राहत नाही. 

Continues below advertisement

अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या महत्त्वाच्या गरजा आहेत. मात्र, सध्याच्या लाइफस्टाइलच्या गरजांमुळे खर्च वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आवश्यक खर्च आणि अनावश्यक खर्च यातला फरक लक्षात न आल्यामुळे अनेकांकडून पैशांची बचत होत नाही. एका अभ्यासानुसार, बहुतांशी जण आपल्या पगारातील 10 ते 20 टक्के हिस्सा हा अनावश्यक बाबींमध्ये खर्च करतात. एखाद्या व्यक्तीला 50 हजार रुपये पगार असेल तर ती व्यक्ती किमान पाच हजार रुपये अनावश्यक खर्च करते. आर्थिक शिस्त पाळल्यास काही प्रमाणात तुमची बचत होऊ शकते. 

रेस्टोरंट्स, ऑनलाइन फूड ऑर्डर: मोठ्या शहरांमध्ये रेस्टोरंट्समध्ये जाणे किंवा ऑनलाइन फूड ऑर्डर करण्याचे प्रमाण वाढले आहे. कधीतरी बाहेरून पदार्थ ऑर्डर करणे ही समजण्यासारखी बाब आहे. मात्र, अनेकजण अनावश्यकपणे ऑनलाइन फूड ऑर्डर करतात अथवा रेस्टोरंट्समध्ये जातात. 

Continues below advertisement

पर्यटन, भटकंती: अनेकजण देश-विदेशात फिरण्यासाठी जातात. वर्षातून किमान दोन वेळेस पर्यटनास जाणे ही बाब समजू शकतो. मात्र, अनेकजण दर महिन्याला बाहेर फिरण्यासाठी जातात. अशामुळे तुमचा महिन्याचा खर्च वाढतो. आनंदासाठी पर्यटन करणे आवश्यक आहे. मात्र, ज्या पर्यटनांमुळे आपल्यावर आर्थिक भार येता कामा नये याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. 

आवश्यक नसलेल्या वस्तूंची खरेदी: अनेकजण आवश्यकता नसतानाही अनेक वस्तू खरेदी करतात. विशेषत: गॅजेट्स खरेदी करतात. मात्र, त्याचा वापर फार कमी वेळेस केला जातो. अनावश्क वस्तूंची खरेदी ही सेल, ऑफर आणि क्रेडिट कार्डच्या वारेमाप खर्चातून होत असते. या खर्चावर लगाम लावल्यास तुमचा आर्थिक खर्च वाचेल. 

शॉपिंग: जेव्हा तुम्ही खरेदी करण्यासाठी जाता तेव्हा अधिक खरेदी होते.  शॉपिंगला जाण्याआधी तुम्ही खरेदी करणाऱ्या वस्तूंची यादी तयार करा. ऑफरला भुलून इतर खर्च करू नका. त्याशिवाय सर्वात महागडी आणि सर्वात स्वस्त वस्तू खरेदी करण्याची सवय बदलावी लागेल. अनेकजण ब्रॅण्डच्या नादात खूप खर्च करतात. महागड्या, ब्रॅण्डेड वस्तूंची खरेदी करणे हे आपल्या 'स्टेट्स'साठी आवश्यक असल्याचा गैरसमज अनेकांचा असतो. 

दारू आणि सिगारेट: मद्य आणि सिगारेट सेवनाचे व्यसन असेल तर सावध व्हा. या सवयी आरोग्यासाठी घातक आहेतच शिवाय अधिक खर्चिकदेखील आहे. काहीजणांची पार्टी दारू-सिगारेटशिवाय पूर्ण होत नाही. सिगारेट-दारूच्या व्यसनासाठी अनेकजण हजारो रुपये खर्च करतात. 

त्याशिवाय अनेकजण,  स्पा, सलून वगैरेसारख्या गोष्टींवरही आवश्यकतेपेक्षा अधिक खर्च करतात. सलूनमध्ये शेव्हिंगसाठी गेल्यानंतर फेशियल, ब्लिचिंगवर खर्च करतात. त्याशिवाय अनेकदा महागड्या सलूनमध्ये जातात. हा खर्च कमी करता येऊ शकतो. अशा अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास अनावश्यक खर्च टाळता येऊ शकतो.