Multibagger: असा शेअर जो तुम्हाला देऊ शकतो, इतक्या पटींनी अधिक परतावा, असा शेअर जो तुम्हाला बनवू शकतो करोडपती. वगैरे वगैरे! असं शीर्षक तुम्ही अनेकदा वाचलं असेल. किंवा एखाद्या कंपनीने गेल्या काही वर्षात किती पैसे कमवून दिले हेही तुम्ही वाचलं असेल. आजचा आपला चर्चेचा विषय हाच आहे. Multibagger!


● Multibagger शेअर्स म्हणजे काय.? 

तर ते शेअर्स जे कमी कालावधीत खूप जास्त परतावा देतात. तो परतावा पटीत मोजता येईल इतका परतावा. 2x म्हणजे दुप्पट, 3x म्हणजे तिप्पट अशा पध्दतीने तो मोजू शकता. म्हणजे 80₹ चा शेअर वर्ष दोन वर्षात 300₹ पर्यंत जात असेल तर 4x परतावा मिळाला असं तुम्ही म्हणू शकता. 


● Multibagger शेअर्स कुठे सापडतील.?


बऱ्याचदा हे शेअर्स small cap अथवा midcap मधून सापडतील. म्हणजे अशा कंपन्या ज्यांचं सध्याचं मार्केट कॅपिटल कमी आहे आणि ज्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. ज्या कंपनीला वाढण्याची व्याप्ती जास्त आहे तर ती कंपनी अधिक प्रगती करेल. अशा कंपन्या तुम्हाला Midcap व Small cap मध्येच जास्त मिळतील. त्या शोधण्यासाठी बऱ्याच बाबींचा अभ्यास करावा लागेल त्याबद्दल Fundamental अथवा Research Analysts अधिक सांगू शकतील.


Multibagger Shares हे तेजीच्या बाजारात ढिगाने सापडतात पण ज्यावेळी बाजारातील liquidity कमी होते आणि तेजीला लगाम लागतो तेंव्हा मात्र असे शेअर्स लवकर सापडत नाहीत आणि विशेष म्हणजे आधीच्या तेजीत ज्यांनी हे शेअर्स खरेदी केले असतात त्यांना exit सुद्धा करता येत नाही. मग पुढचे अगदी काही वर्षे अशा शेअर्समध्ये परतावा मिळत नाही. उलट हे शेअर्स 50% पेक्षा अधिक लॉसमध्ये जाताना दिसतात.
यातही दोन वेगळे प्रवाह आहेत.


1. ज्या कंपन्यांचे मुख्यतः Fundamentals बदललेले असतात आणि भविष्यात त्या कंपनीच्या बिजनेस मध्ये ग्रोथ होणार असते ते शेअर्स वेगाने वाढत जातात. म्हणजेच, शेअरमध्ये तेजी येण्यासाठी शाश्वत कारण असतं. याचं उदाहरण द्यायचं झालं तर EV अर्थात Electric Vehicle. बदलत्या काळानुसार आता EV ची गरज भासू लागली आहे. तर त्याच्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांत Growth ची शक्यता असते. किंवा कोरोना नंतर डिजिटल आणि ऑनलाइन क्षेत्रात मोठी संधी होती. त्यामुळेच अगदी छोट्या छोट्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना कामे उपलब्ध झाली आणि बिजनेस वाढला. त्याचंच प्रतिबिंब शेअर्समध्ये दिसून आलं. अगदी वर्ष दोन वर्षात 2x, 3x, 4x असा परतावा मिळाला आहे. ज्यामध्ये खऱ्या अर्थाने ग्रोथ होत आहे, कंपन्यांचे Fundamentals चांगले आहेत, मॅनेजमेंट चांगली आहे, म्युच्युअल फंड होल्डिंग किंवा मोठे गुंतवणूकदार त्यात गुंतवणूक वाढवत असतील तर त्यात गुंतवणूक करणं साहजिकच फायद्याचं ठरतं. 


2. दुसरी कॅटेगरी थोडीशी वेगळी आहे. असे काही शेअर्स असतात जे रोजच्या रोज Upper Circuit लावत वाढत जातात. विशेषतः हे शेअर्स विशिष्ट टेलिग्राम ग्रुप, युट्युब चॅनेल अथवा विविध प्लॅटफॉर्मवर सतत सुचवले जातात. शिवाय काही शेअर्समध्ये फक्त अफवा आणि तथाकथित चांगल्या बातम्यांचा आधार घेऊन शेअर्समध्ये तेजी येते. अशा शेअर्समध्ये मुख्यतः सामान्य गुंतवणूकदार अडकू शकतो. जिथे कंपन्यांचा नफा वाढत नाही, fundamentals मध्ये फार सकारात्मक बदल होत नाहीत तरीही शेअर्स वाढत असतील तर सावध राहिलं पाहिजे. तेजीच्या बाजारात कसलेही शेअर्स चालून जातात हे आपण गेल्या दोनेक वर्षात बघत आहोत पण त्याचा पूर्वीचा डेटा काढून पाहिला तर अशा काही शेअर्समध्ये फक्त नुकसान झालं आहे. त्यामुळे ऐकीव माहितीच्या आधारे गुंतवणूक करण्यापेक्षा स्वतः अभ्यास करून गुंतवणूक करावी.


शेअर बाजार हे गुंतवणूक करण्याचं क्षेत्र आहे. इथे गुंतवणूक करताना खूप असामान्य अपेक्षा ठेवण्यापेक्षा वास्तविक विचार करून गुंतवणूक करावी. तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये असलेला प्रत्येक शेअर multibagger असू शकत नाही आणि प्रत्येक multibagger तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये असणं गरजेचं नाही. उघडा डोळे, बघा नीट!