Paytm Stocks: गेल्या दोन दिवसांपासून पेटीएम कंपनीचा शेअर (Paytm Share) चांगलाच तेजीत आहे. पेटीएम हे वन 97कम्यूनिकेशन्स लिमिटेड या कंपनीच्या मालकीचे आहे. या कंपनीचा शेअर गुरुवारी 17.95 रुपयांच्या तेजीसह 377.40 रुपयांवर बंद झाला.
सलग दुसऱ्या दिवसापासून अपर सर्किट
One97 Communications या कंपनीचे शेअर्स गेल्या दोन दिवसांपासून चांगली कामगिरी करत आहेत. दोन्ही दिवसांत लिमिटेड या कंपनीच्या शेअरला अपर सर्किटे लागले आहे. सध्या एकूणच शेअर बाजारात घसरण चालू आहे. असे असताना पेटीएमची मालकी असलेल्या वन 97कम्यूनिकेशन्स लिमिटेड ही कंपनी मात्र शेअर बाजारावर चांगली कामगिरी करताना दिसतेय.
पेटीएमच्या भांडवली बाजारात वाढ
सध्या पेटीएमचे बाजार भांडवल 24 हजार कोटी रुपयांच्या जवळ जाऊन पोहोचले आहे. गुरुवारी बाजार चालू असताना हेच बाजार भांडवल 24,000 कोटींपेक्षा अधिक झाले होते. गुरुवारी या कंपनीचे शेअर 400 रुपयांपर्यंत गेला होता. सकाळी 10 वाजेपर्यंत हा शेअऱ 401.55 रुपयांवर पोहोचला होता. पण दिवसाअखेर 377.40 रुपयांवर बंद झाला.
या कारणामुळे शेअरचे मूल्य वाढले
गेल्या काही दिवसांपासून अदाणी उद्योग समूहाचे गौतम अदाणी हे फीनटेक क्षेत्रात पदार्पण करणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर गौतम अदाणी यांनी पेटीएममध्ये गुंतवणूक केल्याचा दावा 30 मे रोजी करण्यात आला. या वृत्तामुळे पेटीएमच्या शेअरमध्ये चांगलीच वाढ झाली. मात्र गौतम अदाणी यांच्यासोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. अदाणी यांनी गुंतवणूक केल्याच्या वृत्तात कोणतेही तथ्य नाही, असे पेटीएमने स्पष्ट केलेले आहे. या स्पष्टीकरणानंतरही पेटीएमच्या शेअरला गुरुवारी अपर सर्किट लागले.
दोलत कॅपिटल या ट्रेडिंग फर्मने पेटीएमचा शेअर एका वर्षांत 70 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हा शेअर 650 रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असे दोलत कॅपिटलने म्हटले असून बाय रेटिंग दिली आहे. येस सिक्योरिटिजनेही पेटीएमच्या शेअरसाठी 450 रुपयांचे टार्गेट दिले आहे.
दरम्यान, पेटीएम शेअरचे गेल्या 52 आठवड्यातील सर्वोच्च मूल्य 998.30 रुपये आणि 52 आठवड्यातील सर्वांत कमी मूल्य 310 रुपये आहे. गुरुवारी बाजार संपण्याअखेर पेटीएमच्या शेअरमध्ये 4.99 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. हा शेअर दिवसाअखेर 17.95 रुपयांनी वधारला.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
शुक्रवारी 'या' 10 पेनी स्टॉक्सचा राहणार बोलबाला? गुंतवणूकदार होऊ शकतात मालामाल!
एसी तयार करणारी 'ही' कंपनी जोमात, फक्त पाच दिवसांत दिले 47 टक्के रिटर्न्स!