PayTm share listing : डिजीटल मोबाइल पेमेंट प्लॅटफॉर्म असलेल्या पेटीएमच्या शेअर लिस्टिंगकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र, आयपीओमध्ये शेअर मिळालेल्या गुंतवणूकदारांना लिस्टिंगच्या वेळेस प्रतिशेअर 200 रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. पेटीएमच्या शेअरची बंपर लिस्टिंग होईल अशी अपेक्षा होती. मात्र, गुंतवणुकदारांना मोठा झटका बसला. शेअर बाजार बंद झाला त्यावेळेस पेटीएमच्या शेअरचा दर 1560 इतका होता. या शेअरच्य घसरणीत काही कारणे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. 


बीएसईवर पेटीएमची पालक कंपनी असलेल्या 'वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड' या शेअरची १९५५ रुपयांना नोंदणी झाली. तर एनएसई वर पेटीएमचा शेअर १९५० रुपयांना सूचीबद्ध झाला. आयपीओसाठी कंपनीने प्रती शेअर २०८० ते २१५० रुपये इतका प्राइसबॅण्ड निश्चित केला होता. आयपीओमध्ये पेटीएमचा शेअर मिळालेल्या गुंतवणुकदारांचा मोठा अपेक्षाभंग झाला. पेटीएमचा शेअर बाजारात सूचीबद्ध होताना कमी दरात झाला, याची काही कारणे असल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले. 


पेटीएमच्या शेअरकडून गुंतवणुकदारांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. पेटीएमची सुरुवात झाली तेव्हा डिजीटल पेमेंटमध्ये त्यांचे एकहाती वर्चस्व होते. आता मात्र, इतरही कंपन्या डिजीटल पेमेंट क्षेत्रात आल्या आहेत, असे शेअर बाजार तज्ज्ञ पंकज जयस्वाल यांनी म्हटले. पेटीएम सध्या तोट्यात आहे. त्यातच आता डिजीटल पेमेंटच्या व्यवसायात एकाधिकारशाही नसल्यामुळे भविष्यातील वाटचालीबाबत शंका आहेत. अनेक मोठ्या गुंतवणुकदारांनी पेटीएमबाबत 'वेट अॅण्ड वॉच'ची भूमिका घेतली असल्याचे पंकज जयस्वाल यांनी म्हटले.


जागतिक शेअर बाजारात पडझड झाली. त्याचा परिणामही भारतीय शेअर बाजारावर झाला. मात्र, शेअर बाजारात आज ऐतिहासिक दिवस होता. मोठा आयपीओ असलेल्या पेटीएमचा शेअर आज बाजारात सूचीबद्ध झाला. मात्र, हा शेअर ऑफर किंमतीपेक्षाही 25 टक्के कमी दरात सूचीबद्ध झाला. मागील काही शेअर्सने सूचीबद्ध होताना चांगला दर दिला. त्यामुळे पेटीएमकडे अनेकांचे लक्ष होते असे शेअर बाजार तज्ज्ञ सुनील शहा यांनी म्हटले. पेटीएमच्या आयपीओमध्ये प्रतिशेअर किंमत खूपच होती, असे गुंतवणुकदारांना वाटले. त्याशिवाय,  मोठ्या गुंतवणुकादारांनी पेटीएमच्या आयपीओला फारसा प्रतिसाद दिला नाही. त्याच्या परिणामी हा शेअर सूचीबद्ध होताना कमी किंमतीत झाला असे त्यांनी म्हटले. 


संबंधित बातमी:


Paytm IPO Listing : पेटीएमच्या शेअर्सची संथ सुरुवात, गुंतवणूकदारांना मोठ्या फायद्यासाठी पाहावी लागणार वाट


Multibagger Stock Tips: 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांच्याजवळील 'हा' स्टॉक 125 टक्क्यांनी वधारला


Multibagger stocks: आयटी क्षेत्रातील 'या' स्टॉकने दीड वर्षात एक लाखाचे केले 15 लाख रुपये



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha