Chinese Land Grab : डोकलामजवळ चीनने चार गावं वसवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वर्षभरापासून भारत आणि चीनमध्ये सीमेवर शांतता राखण्यासाठी चर्चा सुरु आहे. पण या चर्चेतून सीमेवरील तणाव कमी झाला नसल्याचं दिसतेय. सॅटेलाइट छायाचित्राच्या आधारावर डोकलामजवळील भूटानच्या वादग्रस्त जागेत चीनने चार गावं वसवल्याचा दावा केला जातोय. जागतिक भौगोलिक अभ्यासक @detresfa यांनी सॅटेलाइटचा फोटो पोस्ट केलाय. 






डेट्रस्फानं दिलेल्या माहितीनुसार, मे 2020 नंतर चीनने ही चार गावं वसवली आहेत. हा भाग भूटान आणि चीनमधील यांगडू-चुम्बी यामधील आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या जागेसाठी चीन आणि भूटानचा वाद सुरु आहे. ही जागा भूटनने चीनला देऊ केली का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. नुकताच चीन आणि भूटानमध्ये सीमावाद मिटवण्यासाठी एक करार झालाय. 
 
अमेरिकन काँग्रेसला पेंटागॉननं सादर केलेल्या वार्षिक अहवालातही चीनच्या एलएसीवरील कारवायांचा उल्लेख करण्यात आलाय. अरुणाचल प्रदेशच्या भागात चीननं एक गाव उभारल्याचं पेंटागॉनच्या अहवालत म्हटलं. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दावा करण्यासाठी चीनकडून वाढत्या कारवाया सुरू असल्याचं पेंटागॉनच्या अहवालात नमूद करण्यात आलंय. अरुणाचल प्रदेशजवळील वादग्रस्त ठिकाणी चीनने 100 घराचं गाव वसवल्याचा दावा पेंटागॉनच्या रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता.


एपीबी न्यूजने गेल्यावर्षी सिक्कीमजवळील वादग्रस्त जागेवर चीनच्या अशाच वादग्रस्त गावांचे फोटो प्रसारित केले होते. तसेच लेफ्टिनेंट जनरल मनोज पांडे यांनीही नुकतेच चीनच्या अतिक्रमाणाबाबत चिंता व्यक्त केली होती.  


सीमेवर चीनकडून फायबर ऑप्टिक्सचे नेटवर्क तयार
गेल्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये भारताच्या उत्तर सीमेवरील लडाख या ठिकाणी भारत आणि चीनमध्ये सीमावादावरुन तणाव निर्माण झाला होता. पण यामध्ये भारताला गुंतवून ठेवायचं आणि  हा चीनचा बनाव होता असं अमेरिकेच्या पेंटॅगॉनने त्यांच्या अहवालात सांगितलं आहे. ज्यावेळी चीनचा भारतासोबत वाद सुरु होता त्याचवेळी पश्चिम हिमालयाच्या परिसरात चीनकडून फायबर ऑप्टिक्सचे नेटवर्क निर्माण करण्यात येत होतं. संपूर्ण जगभरात कोरोनाच्या विरोधात लढाई सुरु असताना, तसेच भारत चीनसोबतच्या वादात गुंतला असताना चीन मात्र आपल्या लष्करी तयारीवर जोर देत होता.