Paytm: भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) पर्सनल लोनचे नियम कठोर केल्यानंतर पेटीएमनं (Paytm) छोट्या पर्सनल लोनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पेटीएम आता 50 हजार रुपयांपेक्षा कमी पर्सनल लोनची संख्या कमी करणार आहे. कंपनीनं बुधवारी यासंदर्भात माहिती दिली. महत्त्वाची गोष्ट आहे की, आरबीआयच्या कठोरतेनंतर पेटीएमच्या छोट्या कर्जाच्या संख्येत 50 टक्क्यांपर्यंत मोठी कपात पाहायला मिळत आहे. 


कंपनीवर मोठा परिणाम होणार नाही : Paytm


आपल्या निर्णयाबाबत बोलताना पेटीएमनं सांगितलं की, कंपनीच्या कमाईवर आणि मार्जिनवर या निर्णयाचा फारसा परिणाम होणार नाही. कारण 50 हजार रुपयांपेक्षा जास्त कर्जामध्ये भरपूर क्षमता आहे. अलिकडेच, भारतीय रिझर्व्ह बँकेनं पर्सनल लोनबाबत नियम अत्यंत कठोर केले आहेत. रिझर्व्ह बँकेनं लहान कर्जांच्या रिस्क वेट 25 टक्क्यांपर्यंत वाढवलं आहे. त्यामुळे आता ते 100 टक्क्यांवरून 125 टक्के झालं आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर पर्सनल लोन महाग होणार असून पेटीएमसारख्या कंपन्यांना असुरक्षित पर्सनल लोनची संख्या कमी करणं भाग पडलं आहे.


पेटीएमचे शेअर्स घसरले 


पेटीएमनं छोट्या रकमेच्या असुरक्षित पर्सनल लोनची संख्या कमी करण्याच्या निर्णयानंतर, गुरुवारी शेअर बाजारात कंपनीला मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं. शेअर बाजारात कंपनीचे शेअर्स गडगडले. डिजीटल पेमेंट फर्म Paytm ची मूळ कंपनी One97 Communications चे शेअर्स 7 डिसेंबरला तब्बल 20 टक्क्यांनी घसरले. यानंतर 9.23 मिनिटांनी लोअर सर्किट लागू झालं आहे.


कंपनीच्या उत्पन्नावर परिणाम


ब्रोकरेज फर्म जेफ्रीजनं (Jefferies) सांगितलं की, आरबीआयच्या छोट्या पर्सनल लोनचे नियम कठोर करण्याच्या निर्णयानंतर पेटीएमच्या बाय नाऊ पे लेटर (Buy Now Pay Later) व्यवसायावर थेट परिणाम होणार आहे. कंपनीनं जारी केलेल्या कर्जांमध्ये लहान पर्सनल लोनचा वाटा 55 टक्के आहे. यामध्ये कंपनी पुढील 3 ते 4 महिन्यांत 50 टक्क्यांपर्यंत कपात करेल. जेफरीजनं कंपनीच्या महसूल अंदाजात 3 ते 10 टक्के कपात केली आहे.