Pakistan Inflation: आपल्या शेजारी असणारा पाकिस्तान (Pakistan) देश अनेक काळापासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. दिवसेंदिवस देशाची परिस्थिती आणखी बिघडत चालली आहे. महागाईने (Inflation) सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात देशाचा महागाई दर 40 टक्क्यांच्या वर कायम आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनमधील बातमीनुसार, पाकिस्तानमध्ये गॅसच्या वाढत्या किमतींमुळे देशात महागाईत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, या वाढत्या महागाईनं सर्व विक्रम मोडले आहेत.
खाण्यापिण्यापासून या सर्व गोष्टी महाग
पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 23 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात देशातील महागाई दर 41.13 टक्के नोंदवला गेला. गेल्या वर्षभरात देशातील गॅसच्या किमती 1,100 रुपयांनी वाढल्या आहेत. पाकिस्तानमध्ये गॅसशिवाय खाद्यपदार्थांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. देशात पिठाच्या किंमतीत 88.2 टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे. याशिवाय बासमती तांदूळ 76.6 टक्के, तांदूळ 62.3 टक्के, चहाची पाने 53 टक्के, लाल तिखट 81.70 टक्के, गूळ 50.8 टक्के आणि बटाटे 47.9 टक्के महागले आहेत. गेल्या वर्षभरात देशात कांद्याचे दर 36.2 टक्के, टोमॅटो 18.1 टक्के, मोहरीचे 4 टक्के आणि वनस्पती तेलाचे भाव 2.90 टक्क्यांनी वाढ झालीआहेत.
देशातील अल्पकालीन चलनवाढ, ज्याला सेन्सिटिव्ह प्राइस इंडिकेटर (SPI) म्हटले जाते, गेल्या एका आठवड्यात 10 टक्क्यांनी झेप घेतली आहे. ती वाढ 308.90 च्या तुलनेत 309.09 टक्क्यांवर पोहोचली आहे. हा डेटा पाकिस्तानच्या 17 प्रमुख शहरांतील 50 बाजारांतील 51 जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींचा समावेश करून तयार केला आहे. PBS च्या म्हणण्यानुसार, देशात 18 जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत, तर 12 वस्तूंच्या किमती स्वस्त झाल्या आहेत आणि 21 वस्तूंच्या किमती जुन्याच पातळीवर राहिल्या आहेत.
ऑगस्टमध्ये महागाईचा दर घसरला होता
मे 2023 पासून पाकिस्तानातील महागाई दरात सातत्याने घट होत आहे. ऑगस्टमध्ये तो दर 24.40 टक्क्यांपर्यंत घसरला होता. यानंतर पुन्हा एकदा महागाई दरात वाढ झाली असून 16 नोव्हेंबर रोजी तो 40 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. पाकिस्तान दीर्घकाळापासून आर्थिक संकटाशी झुंजत आहे. देशाला दिवाळखोरीचा धोका आहे. त्यामुळे देशातील राजकीय अस्थिरता आणखी वाढली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: