Big announcement in poor Pakistan : आपल्या शेजारील देश पाकिस्तानने मोठी घोषणा केली आहे. पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटात (Economic crisis) सापडला आहे. त्यामुळं राष्ट्रपतींसह, गृहमंत्री पगाराशिवाय काम करणार आहेत. 68 वर्षीय आसिफ अली झरदारी यांनी पाकिस्तानचे 14 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. त्यानंतर लगेचच त्यांनी कोणतेही वेतन घेणार नसल्याची घोषणा केलीय. 


पाकिस्तान सध्या इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानमध्ये सध्या नवे सरकार स्थापन झाले आहे. यासह आसिफ अली झरदारी देशाचे 14 वे राष्ट्रपती बनले आहेत. गरिबीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानची सध्याची परिस्थिती पाहता नवनिर्वाचित राष्ट्रपतींनी मंगळवारी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात कोणताही पगार न घेण्याची घोषणा केली आहे. झरदारी यांच्या निर्णयानंतर देशाच्या नव्या गृहमंत्र्यांनी पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे.


आव्हानात्मक परिस्थितीत मदतीसाठी घेतला निर्णय 


दरम्यान, पीटीआयने (PTI) दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी मंगळवारी त्यांच्या कार्यकाळात कोणताही पगार न घेण्याची घोषणा केली. पाकिस्तानातील दीर्घकाळापासून सुरू असलेले आर्थिक संकट आणि महागाईमुळं पाकिस्तानातील लोकांची आर्थिक समस्या लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे. 68 वर्षीय राष्ट्राध्यक्ष झरदारी यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) च्या ट्वीटरवर ही माहिती दिली आहे. आव्हानात्मक परिस्थिती पाहता मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं देशाच्या महसुलावर बोजा पडणार नाही असे झरदारी म्हणाले.


पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत नेत्यांपैकी झरदारी हे एक 


आसिफ अली झरदारी यांच्या या निर्णयाबाबत राष्ट्रपतींच्या सचिवालय प्रेस विंगमधून एक प्रसिद्धी जारी करून माहिती देण्यात आली आहे. झरदारी हे पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत नेत्यांपैकी एक आहेत. त्यांची एकूण संपत्ती सुमारे 1.8 अब्ज डॉलर्स आहे. केवळ पगार माफ करण्याची मोठी घोषणा राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी केलेली नाही. उलट त्यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. खरे तर राष्ट्रपतीपदाची शपथ घेताना त्यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांची मुलगी असिफा झरदारी यांना पाकिस्तानच्या 'फर्स्ट लेडी'चा दर्जा देण्याची घोषणा केली. इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपतींच्या मुलीला फर्स्ट लेडीचा दर्जा दिला जात आहे.


राष्ट्रपतींना दरमहा किती वेतन?


राष्ट्रपतींच्या वेतनाचा निर्णय संसद घेत असते. या पदावर असलेल्या व्यक्तीला (पाकिस्तानचे अध्यक्ष वेतन) दरमहा 8,46,550 रुपये मिळतात. याशिवाय इतर भत्त्यांचे लाभही दिले जातात. राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या घोषणेनंतर, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून, देशाच्या नवीन सरकारचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनीही पाकिस्तानच्या आर्थिक आव्हानांचा हवाला देत आपला पगार सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री नक्वी यांनीही ट्वीटरवर याबाबतची माहिती दिली. आम्ही  देशाची सेवा करण्यासाठी वचनबद्ध आहोत, ही आव्हानात्मक वेळ असल्याचे नक्वी म्हणाले. 


पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट


दरम्यान, पाकिस्तानची आर्थिक स्थिती कोणापासून लपलेली नाही. सोशल मीडियावर देशातील जनतेच्या बिकट अवस्थेचे रोजचे फोटो व्हायरल होत आहेत. चीनसह अनेक देशांच्या कर्जाच्या सापळ्यात अडकलेला पाकिस्तान गरिबीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची (आयएमएफ) मदत असूनही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. महागाईच्या अनागोंदीमुळं लोकांना केवळ अन्नच नाही तर दैनंदिन गरजाही भेडसावत आहेत.


महत्वाच्या बातम्या:


बुडत्याचा पाय खोलात! पाकिस्तानवर मोठं आर्थिक संकट, परकीय कर्जाचा बोजा वाढला