Pakistan Economic crisis : आपल्या शेजारी असणारा पाकिस्तान (Pakistan) देश सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा ( Economic crisis) सामना करत आहे. महागाईचा मोठा सामना या देशाला करावा लागत आहे. दिवसेंदिवस पाकिस्तानवर असलेला कर्जाचा बोजा वाढत आहे. पाकिस्तानचे विदेशी कर्ज गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत 1.2 अब्ज डॉलरने वाढून 86.35 अब्ज डॉलर होता. ज्यामध्ये जागतिक बँक आणि चीनचा सर्वाधिक वाटा होता. आर्थिक व्यवहार मंत्रालयाने चालू आर्थिक वर्षासाठी विदेशी आर्थिक मदतीबाबत जारी केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. दरम्यान, जुलै ते सप्टेंबर, 2023 मध्ये 1.5 अब्ज डॉलर कर्जाच्या परतफेडीवर पाकिस्तानला एकूण 3.5 अब्ज डॉलर मिळाले होते. परिणामी निव्वळ 1.97 अब्ज डॉलर मिळाले होते. 


विदेशी कर्ज 86.35 अब्ज डॉलरवर 


पाकिस्तान सरकारचे एकूण विदेशी कर्ज सप्टेंबर 2023 पर्यंत 86.35 अब्ज डॉलर झाले आहे. मंत्रालयाच्या हवाल्याने द डॉन वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, एकूण विदेशी  कर्जापैकी सुमारे 64 टक्के कर्ज सवलतीच्या अटी आणि दीर्घ मुदतीच्या कालावधीसह बहुपक्षीय आणि द्विपक्षीय स्त्रोतांकडून प्राप्त झाले आहे. मार्च 2023 पर्यंत पाकिस्तानचे बाह्य सार्वजनिक कर्ज 85.18 अब्ज डॉलर होते. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत 642 दशलक्ष डॉलर किमतीचे नवीन कर्ज करार केले होते. पाकिस्तानला कर्ज देणाऱ्या बहुपक्षीय संस्थांपैकी, जागतिक बँकेने 306 दशलक्ष डॉलर्स दिले होते. तर चीन 509 दशलक्ष डॉलरसह आघाडीचा द्विपक्षीय कर्जदार म्हणून उदयास आला.


महागाई दरात झाली मोठी वाढ


पाकिस्तान देश अनेक काळापासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. दिवसेंदिवस देशाची परिस्थिती आणखी बिघडत चालली आहे. महागाईने (Inflation) सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. देशाचा महागाई दर 40 टक्क्यांच्या वर कायम आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनमधील बातमीनुसार, पाकिस्तानमध्ये गॅसच्या वाढत्या किमतींमुळे देशात महागाईत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. हवामान बदलाचा मोठा फटका पाकिस्तानला बसला आहे. सध्या पाकिस्तानने त्यांची कृषी क्षेत्रातील आणि ऊर्जा क्षेत्रातील धोरणे सुधारली पाहिजेत असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. शेती, अनुदान आणि इतर अनेक उणिवा दूर करण्याची गरज आहे. जेणेकरून देशातील छोट्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकेल असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. तसेच, अधिकाधिक लोकांना शेतीमध्ये येण्यासाठी प्रोत्साहित करता येईल. पाकिस्तानच्या खराब आर्थिक मॉडेलमुळं तो आपल्या सहकारी देशांच्या तुलनेत खूपच मागे पडला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


इतर देशांच्या तुलनेत पाकिस्तान खूपच मागे, गरिबी दूर करण्यासाठी पाकिस्ताननं काय करावं? जागतिक बँकेनं दिल्ला 'हा; सल्ला