Onion Price : सध्या कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण दिवसेंदिवस कांद्याच्या दरात घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याचा मोठा आर्थिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. दरम्यान, अशातच बांगलादेशनं भारतीय कांदा उत्पादक शेतकऱ्याचं टेन्शन वाढवलं आहे. जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय आहे.


नेमकं प्रकरण काय?


कांद्याच्या दरात घसरण सुरूच असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भावातील घसरण थांबवण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवरील 20 टक्के शुल्क हटवण्याची मागणी शेतकरी आणि निर्यातदार करत आहेत. मात्र, सरकार मात्र याबाबत मौन बाळगून आहे. दुसरीकडे बांगलादेशमुळं भारतीय कांद्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता बळावली आहे. कारण, बांगलादेशातील वृत्तपत्र 'ढाका ट्रिब्यून'ने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी बांगलादेशात कांद्याच्या लागवडीत सुमारे 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. ही बातमी भारतातील शेतकऱ्यांसाठी चितेंची आहे. कारण बांगलादेश हा भारतीय कांद्याचा मोठा आयातदार आहे. आता तिथे कांद्याची लागवड वाढल्याने आयात कमी होईल, ज्यामुळे भारतात भाव आणखी घसरण्याचा शक्यता आहे. 


कांदा निर्यातीवरील 20 टक्के शुल्क रद्द केले नाहीतर दरात आणखी घसरण होण्याची शक्यता


दुसरीकडे, केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अहवालात असे म्हटले आहे की, गेल्या एका आठवड्यात (1 ते 8 जानेवारी 2025) कांद्याच्या भावात 10.84 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. तर 8 डिसेंबर 2024 ते 8 जानेवारी 2025 दरम्यान म्हणजेच एका महिन्यात किमती 43.77 टक्क्यांनी घसरल्या आहेत. भाव घसरल्याने शेतकरी चिंतेत आहे. बाजारातील तज्ज्ञ आणि शेतकरी संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार,  निर्यातीवरील 20 टक्के शुल्क रद्द केले नाहीतर भाव आणखी खाली येऊ शकतात. सध्या खरीप हंगामातील कांदा बाजारात येत असून, तो साठवूनही ठेवता येत नाही. कारण हा कांदा लवकर खराब होऊ लागतो.


कांद्याच्या किंमतीत मोठी घसरण


कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार, 8 जानेवारीला कांद्याची सरासरी किंमत 2128.84 रुपये प्रति क्विंटल होती. तर महिनाभरापूर्वी 8 डिसेंबर 2024 रोजी ते 3786.56 रुपये प्रतिक्विंटल होते. सध्या सोलापूर, येवला आणि धुळे मंडईत कांद्याचा किमान भाव केवळ 200 रुपये प्रतिक्विंटल म्हणजेच 2 रुपये किलो झाला आहे. 


महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन


जगभरात सुमारे 25 टक्के वाटा असलेला भारत हा जगातील सर्वात मोठा कांदा उत्पादक देश आहे. तर भारतातील सर्वात मोठा कांदा उत्पादक महाराष्ट्र आहे, राज्यात देशातील 43 टक्के कांद्याचे उत्पादन होते. महाराष्ट्रात कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात रोष आहे.