Buy Goceries On WhatsApp: मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वर JioMart लॉन्च करण्यासाठी तंत्रज्ञान कंपनी मेटा आणि जिओ प्लॅटफॉर्मने हातमिळवणी केली आहे. या भागीदारीमुळे रिलायन्स रिटेलचे ग्राहक व्हॉट्सअॅपवर किराणा सामान ऑर्डर करू शकतील. दोन्ही कंपनीने एकत्रितपणे जारी केलेल्या निवेदनानुसार, WhatsApp वर JioMart ऑनलाईन खरेदीदारांना JioMart च्या किराणा मालाच्या यादीशी जोडेल. कार्टमधील वस्तूंसाठी पैसे देऊन ग्राहक या यादीतून वस्तू खरेदी करू शकतात.


याबाबत माहिती देताना मेटाचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक पोस्‍ट करत म्हटलं आहे की, ‘’आम्‍ही भारतात जिओमार्टसोबत आमची भागीदारी सुरू करण्यास उत्सुक आहोत. व्‍हॉट्सअॅपवर आमचा हा पहिलाच एंड-टू-एंड शॉपिंग अनुभव आहे. लोक आता चॅटिंग करत जिओमार्टवरून किराणा सामान खरेदी करू शकतात. बिझनेस मेसेजिंग हे खऱ्या अर्थाने गती असलेले क्षेत्र आहे आणि यासारखे चॅट-आधारित अनुभव येणार्‍या वर्षांमध्ये लोक व व्यवसायाशी संवाद साधण्याचा मार्ग असतील."


तसेच याबाबत बोलताना रिलायन्‍स इंडस्‍ट्रीजचे अध्‍यक्ष व व्‍यस्‍थापकीय संचालक मुकेश अंबानी म्‍हणाले, ‘’भारताला जगातील अग्रगण्य डिजिटल समाज म्हणून पुढे नेण्याचे आमचे ध्येय आहे. 2020 मध्ये जिओ प्लॅटफॉर्म व मेटाने आपल्‍या सहयोगाची घोषणा केली, तेव्हा मार्क व मी अधिकाधिक लोक व व्यवसाय ऑनलाइन आणण्याचा आणि प्रत्येक भारतीयाच्या दैनंदिन जीवनात सोयी वाढवणारे खरोखरंच नाविन्यपूर्ण उपाय तयार करण्याचा दृष्टीकोन ठेवला. आम्‍हाला अभिमान वाटतो असा डिझाइन केलेला नाविन्यपूर्ण ग्राहक अनुभव म्हणजे व्‍हॉट्सअॅपवर जिओमार्टसोबतचा पहिला एंड-टू-एंड शॉपिंग अनुभव. व्‍हॉट्सअॅपवरील जिओमार्टचा अनुभव लाखो भारतीयांसाठी ऑनलाईन शॉपिंग सुलभ आणि सोयीस्कर करण्याच्या आमच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करतो.’’


दरम्यान, रिलायन्स जिओने भारतात 5G नेटवर्कसाठी सोल्यूशन्स तयार करण्यासाठी क्वालकॉमसोबत भागीदारी केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सोमवारी 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) सांगितले की, कंपनी अत्यंत परवडणारे 5G स्मार्टफोन आणि Google क्लाउड विकसित करण्यासाठी Google सोबत भागीदारी करत आहे. ते पुढे म्हणाले की कंपनीने आता भारतासाठी 5G सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी क्वालकॉमशी करार केला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


मुंबईत ऑगस्ट महिन्यात घरांच्या विक्रीत 20 टक्क्यांची वाढ, तब्बल आठ हजार घरांची विक्री, गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्याच्या महसुलात 74 टक्क्यांची वाढ
Share Market : गुंतवणूकदारांची चांदी... शेअर बाजारात मोठी उसळण; Sensex 1,564 अंकानी वधारला