New Rules : सर्वांसाठी एक महत्वाची बातमी आहे. 1 ऑगस्टपासून अनेक महत्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. एलपीजी किंमत, युपीआय पेमेंट, क्रेडिट कार्ड विमा यात बदल होऊ शकतो. तसेच ऑगस्ट महिन्यात बँकाही अनेक दिवस बंद राहणार आहेत. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
दरम्यान, 1 ऑगस्ट 2025 पासून बदलणाऱ्या नियमांमुळं तुमच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो. क्रेडिट कार्ड , यूपीआय, घरगुती गॅस, सीएनजी, बँक सुट्ट्या आणि हवाई इंधनाच्या किंमतींमध्ये बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे या बदलांची माहिती असणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या खर्चाचे नियोजन करू शकाल.
गॅस सिलेंडरच्या दरात घसरण होण्याची शक्यता
घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. तेल कंपन्या दर महिन्याच्या 1 तारखेला सिलेंडरच्या किंमती ठरवतात. जुलै महिन्यात 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची घट झाली होती, परंतु घरगुती गॅसच्या किमती स्थिर होत्या. आता 1 ऑगस्टला घरगुती गॅस स्वस्त होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकेल.
एटीएफच्या किमती
1 ऑगस्टपासून एअर टर्बाइन फ्युएल (विमानाचे इंधन) च्या किमतीत बदल होऊ शकतो. याच्या किमती वाढल्या तर विमानाच्या तिकीटाच्या किमती वाढू शकतात. तसेच इंधनाची किंमत कमी झाली तर विमान प्रवास स्वस्त होण्याची शक्यता आहे.
UPI पेमेंटसाठी नवे नियम
UPI पेमेंटसाठी देखील काही नवे नियम आले आहेत. तुम्ही जर पेटीएम, फोनपे किंवा गुगल पे वापरत असाल, तर भारतीय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन काही मर्यादा घातल्या आहेत. आता तुम्ही दिवसातून फक्त 50 वेळा बॅलन्स तपासू शकता आणि मोबाईल नंबरशी जोडलेली बँक खाती 25 वेळा पाहू शकता. ऑटोपे ट्रांजेक्शन, जसे की नेटफ्लिक्स किंवा म्युच्युअल फंडचे हप्ते, आता दिवसातून तीन वेळा प्रोसेस केले जातील. सकाळ 10 च्या आधी, दुपारी 1 ते 5 या वेळेत आणि रात्री 9:30 नंतर हे ट्रांजेक्शन होतील. फेल झालेल्या ट्रांजेक्शनचे स्टेटस दिवसातून फक्त 3 वेळा तपासता येईल आणि प्रत्येक तपासणीमध्ये 90 सेकंदांचे अंतर असणे आवश्यक आहे.
ऑगस्ट महिन्यात बँकांना किती दिवस सुट्टी?
ऑगस्ट महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात एकूण 11 दिवस बँका बंद राहण्याची शक्यता आहे. रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार, स्वांतत्र्यादिन, गणेशोत्सव आणि इतर सुट्या आहेत.
विमा संरक्षण बंद होणार
क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एसबीआय कार्ड वापरकर्त्यांसाठी 11 ऑगस्टपासून काही को-ब्रँडेड कार्ड्सवरील मोफत हवाई अपघात विमा संरक्षण बंद होणार आहे. सध्या एसबीआय, यूको बँक, सेंट्रल बँक, पीएसबी, करूर वैश्य बँक आणि अलाहाबाद बँक यांच्या संयुक्त विद्यमाने काही विशिष्ट कार्डांवर 50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत विमा संरक्षण दिले जाते. आता ही सुविधा बंद होत आहे.