Ajit Pawar on MLA Sharad Sonavane : "खात्याला मूर्ख मंत्री भेटलाय, चोर सा**, तो म्हणजे निव्वळ.. आता मी मुख्यमंत्र्यांसमोर त्यांना उभं करणार आहे. सोबतच घोडेगाव प्रकल्प विकासाचे अधिकारी प्रदीप देसाई यांचीही झाडाझडती करणार आहे", असं म्हणत सत्ताधारी आमदार शरद सोनवणे (Sharad Sonavane) यांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला होता. शरद सोनवणे (Sharad Sonavane) जुन्नरचे अपक्ष आमदार पण निवडणुकीनंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत (Eknath Shinde Shivsena) प्रवेश केला. मात्र, आता त्यांनी चक्क मंत्र्यांना मूर्ख म्हणत शिवीगाळ केलीये. दरम्यान, यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिलीये.
अजित पवार म्हणाले, हे महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे का? मी आज सकाळपासून विकासाबाबतचं सांगतोय. ते सगळं सोडून दिलं. काही काही लोकं विकृत असतात. त्यांना प्रत्येकाला उत्तर दिलं तर मला दिवस पुरायचा नाही. मी नेहमी सांगतो, आपला महाराष्ट्र सुसंस्कृत आहे. महाराष्ट्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी चाललेला आहे. त्यांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे. कोण कसं बोलतंय? हे जनता हे सगळं बारकाईने पाहात असते. जे योग्य बोलत नाहीत, त्यांची आम्ही दखल घेण्याचं कारण नाही. आम्ही ते या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देऊ. चांगल्या गोष्टींना उत्तर देण्यासाठी मी बांधील आहे. चुकीचे प्रकार होत असतील तर आम्ही ते थांबवण्यासाठी बांधील आहोत. कोणी कायदा हातात घ्यायचा प्रयत्न करत असेल तर त्याबद्दल आम्ही पुढील कारवाई करण्यासाठी बांधील आहोत.
शरद सोनवणेंचं स्पष्टीकरण, काय म्हणाले?
मी असं बोललोय पण ते मी मंत्र्यांना उद्देशून नव्हे तर घोडेगाव प्रकल्प विकास अधिकारी देसाईबद्दल, असा खुलासा सोनवणेंनी एबीपी माझाशी फोन वर बोलताना केलाय. आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी जुन्नरमध्ये बैठक होती. या बैठकीत आदिवासी समाजाच्या विकासासाठी असलेल्या या घोडेगाव प्रकल्पाचे अधिकारी देसाईंची मी झाडाझडती घेतली. ते समाजाच्या हिताचे काम करत नाहीत, त्यांच्या विरोधात माझ्याकडे खूप तक्रारी आलेल्या आहेत. या देसाईंना गोरगरिबांचे काही पडलेलं नाही, असं असताना देसाई मंत्र्यांच्या मात्र पुढं-पुढं करतो. त्यामुळं मी देसाईंवर संतापलो, असं शरद सोनवणे यांनी स्पष्ट केलं. मात्र, हा संवाद ऐकल्यावर प्रथमदर्शनी तर ते मंत्र्यांना उद्देशून बोलल्याचं जाणवत आहे. त्यामुळं एक सत्ताधारी आमदार आपल्याच सत्तेतील मंत्र्याला उद्देशून असे शब्द वापरत असतील, तर सर्व सामान्यांची काय अवस्था असेल हे सांगण्यासाठी कोणत्या शब्दांची गरज नक्कीच नाही. सोनवणेंच्या म्हणण्यानुसार ते अधिकाऱ्यांना उद्देशून बोललेत असं गृहीत धरलं, तरी एखाद्या लोकप्रतिनिधीने अधिकाऱ्यांबद्दल अशी खालच्या पातळीची भाषा वापरावी का? मुळात हा अधिकार सोनवणेंना घटनेने दिलाय का? हा खरा प्रश्न आहे. आता यामुळं अडचणीत आलेल्या सोनवणेंनी केलेला हा खुलासा आणि व्हिडीओमधील संवाद हा नेमका मंत्र्यांच्या की अधिकाऱ्याबद्दल आहे, हे ज्याचं त्यानं समजून जावं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अमेय खोपकर मल्टिप्लेक्सवाल्यांना धमकी देणे बंद करा, मनसेच्या भूमिकेला अजितदादांच्या राष्ट्रवादीचा विरोध
