Share Market News : भारतीय भांडवली बाजाराच्या निर्देशांकाचा नवा उच्चांक केला आहे. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीनं (Nifty) नवा उच्चांकी स्तर गाठला आहे. सेन्सेक्स 255 अंकांनी वधारत 82 हजार 390 चा टप्पा पार केला आहे. तर निफ्टी 92 अंकांनी वधारत 25 हजार 244 चा टप्पा पार केला आहे. दरम्यान, शेअर बाजारात तेजी आल्यामुळं सकाळ पासूनच उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 


सकाळपासून बाजारात उत्साही वातावरण


आज सकाळपासून बाजारात उत्साही वातावरण पाहायला मिळत आहे. प्री-ओपन सत्रात, सेन्सेक्स 500 हून अधिक अंकांच्या वाढीसह 82640 अंकांच्या जवळ व्यवहार करत होता. तर निफ्टीने जवळपास 100 अंकांची उसळी घेतली आहे. याआधी गुरुवारी देखील देशांतर्गत शेअर बाजाराने नवीन उच्चांक गाठला आहे. कालच्या व्यवहारात सेन्सेक्स 349.05 अंकांच्या (0.43 टक्के) वाढीसह 82134.61 अंकांवर बंद झाला. त्यापूर्वी, सेन्सेक्सने इंट्राडेमध्ये 82,285.83 अंकांची उच्चांक गाठली. जी सेन्सेक्सची नवीन सर्वकालीन उच्च पातळी आहे. त्याचप्रमाणे व्यवहार संपल्यानंतर निफ्टी 99.60 अंकांच्या (0.40 टक्के) वाढीसह 25,151.95 अंकांवर बंद झाला. ट्रेडिंग दरम्यान, निफ्टीने 25,192.90 अंकांची नवीन सार्वकालिक उच्च पातळी गाठण्यात यश मिळवले आहे.


जागतिक बाजारात काय स्थिती?


अमेरिकेतील जीडीपीच्या आकडेवारीनंतर बाजारातील वातावरण काहीसे सुधारले आहे. गुरुवारी वॉल स्ट्रीटवर डाऊ जोन्स औद्योगिक सरासरी 0.59 टक्के वाढली.  S&P 500 जवळजवळ स्थिर राहिले, तर Nasdaq संमिश्र निर्देशांक 0.23 टक्क्यांनी किंचित घसरला आहे. जपानचा निक्केई किंचित वाढला आहे, तर टॉपिक्स 0.23 टक्क्यांनी वर आहे. दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.55 टक्के आणि कोस्डॅक 0.74 टक्क्यांनी वर आहे. मात्र, हाँगकाँगच्या हँगसेंग निर्देशांकाची आजची सुरुवात खराब होण्याची चिन्हे दिसत आहेत.


पहिल्या तिमाहीचे जीडीपीचे आकडे आज येणार


आज चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील म्हणजेच एप्रिल-जून 2024 मधील भारतीय अर्थव्यवस्थेची अधिकृत आकडेवारी जाहीर होणार आहे. त्याआधी, जागतिक क्रेडिट रेटिंग एजन्सी मूडीजने भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज वाढवला आहे. भारतीय अर्थव्यवस्था 2024 मध्ये 7.2 टक्के आणि 2025 मध्ये 6.6 टक्के दराने वाढू शकते, असा मूडीजचा विश्वास आहे.


आयटी शेअर्सवर दबाव


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सेन्सेक्सवरील बहुतेक मोठे समभाग सुरुवातीच्या व्यवहारात नफ्यात होते. बजाज फिनसर्व्ह सर्वात जास्त 1.5 टक्क्यांनी वाढला आहे. टायटन, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स सारखे शेअर्स देखील प्रत्येकी 1 टक्क्यांपेक्षा जास्त नफ्यात होते. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी केवळ 6 समभाग घसरले आहेत. चार मोठे आयटी समभाग टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा तोट्यात होते.