मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरु आहे. मार्च महिन्यातील बाजाराच्या पहिल्या सत्रात देखील सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये घसरण झाली आहे. शेअर बाजारातील घसरणीचं सत्र गेल्या पाच महिन्यांपासून सुरु आहे. या कालावधीत 61 लाख एसआयपी खाती बंद झाल्याची अपडेट आली होती. याच दरम्यान म्युच्युअल फंड इंडस्ट्रीत नव्या गुंतवणूकदारांची संख्या वाढत असल्याचं पाहायला मिळतं. इक्विटी योजनांमधील रिटर्न शेअर बाजारातील घसरणीमुळं प्रभावित झाले आहेत. मात्र नोव्हेंबर 2024 ते जानेवारी 2025 पर्यंत दरमहा 8 लाख नव्या गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड इंडस्ट्रीशी जोडून घेतलं आहे. 


भारतातील म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये नोव्हेंबरपूर्वी दरमहा 10 लाख नवे गुंतवणूकदार जोडले जायचे. नवे गुंतवणूकदार जोडले जाण्याचा वेग थोडा घटला आहे. म्युच्युअल फंड इंडस्ट्रीतील गुंतवणूकदारांची संख्या 5.33 कोटींवर पोहोचली आहे. 


म्युच्युअल फंडमधील गुंतवणूकदारांकडून दीर्घकालीन परताव्यावर विश्वास ठेवल्याचं पाहायला मिळतं. म्युच्युअल फंड योजनांमधील नव्या गुंतवणूकदारांची ओळख पॅन कार्ड क्रमांकावरुन केली जाते. 


सप्टेंबर 2024 मध्ये संपलेल्या 12 महिन्यामध्ये म्युच्युअल फंडमध्ये  विक्रमी वेगानं नवे गुंतवणूकदार जोडण्यात आले. ज्यामुळं गुंतवणूकदारांची संख्या 4 कोटींवरुन  5 कोटी झाली. याची कारणं इक्विटी बाजार आणि नव्या इक्विटी फंडच्या लाँचिंगमध्ये झालेली वाढ हे आहे. आता म्युच्युअल फंडमधील गुंतवणूकदारांची संख्या येत्या पाच वर्षात 10 कोटींवर नेण्याचं लक्ष आहे. 


खाती बंद होण्याची संख्या देखील वाढली


नवे गुंतवणूकदार जरी वाढत असले तरी विद्यमान गुंतवणूकदारांच्या संख्येत देखील घट होत आहे. जानेवारी 2025 मध्ये कित्येक वर्षानंतर एसआयपी खात्यांची संख्या घटली आहे. खाती बंद होण्याच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. भांडवली बाजारात आणि इक्विटी म्युच्युअल फंड रिटर्न घटलं आहे. त्यामुळं एसआयपीच्या संख्येत घट झाली आहे. 



म्युच्युअल फंड इंडस्ट्री बाजारातील तेजी घसरणीचं चित्र पाहायला मिळत असताना देखील नव्या गुंतवणूकदारांना जोडत आहे. ज्यामुळं म्युच्युअल फंड इंडस्ट्रीची मजबुती दिसून येते. येत्या काही महिन्यात म्युच्युअल फंड इंडस्ट्रीसमोरील आव्हानं वाढू शकतात. 


फेब्रुवारीत निफ्टी मिडकॅप 100 मध्ये 13 टक्के घसरण, निफ्टी स्मॉलकॅप 100 मध्ये 11 टक्क्यांची घसरण झाली आहे. मार्च 2020 मध्ये करोना काळात जितकी घसरण झाली होती. त्यानंतरची मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. निफ्टी  50 मध्ये 6 टक्क्यांनी घसरण झाली असून सलग पाच महिने निफ्टी कोसळत आहे. ही गेल्या तीस वर्षातील पहिली वेळ आहे.  


इतर बातम्या :


Share Market : सुरुवातीच्या तेजीनंतर सेन्सेक्स निफ्टीकडून गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग, पुन्हा घसरण सुरु, बाजारात काय सुरु?



(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)