मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी 2030 घरांसाठी सोडत जाहीर केली जाणार आहे. म्हणजेच आपल्याला घर मिळालं की नाही, हे आज समजणार आहे. या सोडत प्रक्रियेत साधारण 1 लाख 13 हजार जणांनी सहभाग नोंदवला आहे. या सोडतीअंतर्गत पवई, विक्रोळी,  ताडदेव, वरळी, वडाळा या ठिकाणची घरं भाग्यवान अर्जदारांना मिळणार आहे. दरम्यान, सोडतीत घर लागल्यानंतर काय करावे? असे प्रश्न विचारला जात आहे. याच पार्श्वभूमीवर लॉटरीत घर मिळाल्यानंतर पैसे कसे भरावे? म्हाडाचा 25 आणि 75 टक्क्यांचा नियम काय आहे? हे जाणून घेऊ या...


स्वीकृतीपत्र द्यावे लागेल


सोडतीत यशस्वी झालेल्या तसेच प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांचे अर्जाचे क्रमांक, नाव इत्यादी म्हाडाच्या housing.mhada.gov.in a mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तसेच Mobile App- Mhada Housing Lottery System वर प्रसिद्ध करण्यात येईल. संगणकीय सोडतीत यशस्वी झालेल्या अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने स्वीकृतीपत्र द्यावे लागेल. त्यानंतर म्हाडातर्फे यशस्वी उमेदवाराला तात्पुरते देकारपत्र Online Login मध्ये प्राप्त होईल. त्यानंतर विजेत्या उमेदवाराला सदनिकेची किंमत दोन टप्प्यांत भरावी लागेल. 


25 टक्क्यांचा नियम काय आहे? 


सोडतीत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांना देकारपत्र मिळाल्यानंतर सदनिकेची किंमत म्हाडाकडे जमा करावी लागेल. ही रक्कम एकूण दोन टप्प्यांत द्यावी लागेल. प्रथम टप्प्यात सदनिकेच्या एकूण किमतीच्या 25 टक्के रकमेचा भरणा करावा लागेल. तात्पुरते देकारपत्र ज्या दिवशी मिळाले, त्या दिनांकापासून पुढे 45 दिवसांच्या आत ही रक्कम भरावी लागेल. रक्कम भरण्याचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर (तात्पुरत्या देकारपत्राच्या दिनांकापासून ४५ दिवसांनंतर) द.सा.द.शे. नियमाप्रमाणे व्याज (म्हाडाच्या प्रचलित धोरणानुसार) आकारणीच्या अधीन राहून 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल. ही मुदतवाढ आपोआप (by default) लागू होईल. या कालावधीतही (तात्पुरत्या देकारपत्राच्या दिनांकापासून 60 दिवसांत) प्रथम टप्प्यातील 25 टक्के रक्कम न भरल्यास सदनिकेचे वितरण रद्द केले जाईल. 


75 टक्क्यांचा नियम काय आहे?


सदनिकेची उर्वरित रक्कम म्हणजेच 75 टक्के रक्कम ही दुसऱ्या टप्प्यात भरावी लागेल. पहिल्या टप्प्याच्या मुदतीनंतर पुढील 60 दिवसांत सदनिकेची उर्वरित 75 टक्के रक्कम भरणे बंधनकारक असते. या कालावधीतही (75 % रक्कमेकरीताचे 60 दिवस) अर्जदाराने 75% रक्कम भरणा न केल्यास, 105 दिवसांचा विहित कालावधी संपुष्टात आल्यानंतर द.सा.द.शे. नियमाप्रमाणे व्याज (म्हाडाच्या प्रचलित धोरणानुसार) दराने व्याज आकारणी करून अर्जदारास आणखी 90 दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल. सदरची मुदतवाढ आपोआप (by default) लागू होईल. याकरीता अर्जदारास विहित कालावधीत मुदतवाढीचा अर्ज सादर करावा लागेल. यानंतरही (तात्पुरत्या देकारपत्राच्या दिनांकापासून 195 दिवसांत) सदनिकेची किंमत अदा न करता आल्यास तात्पुरते देकारपत्र तत्काळ रद्द करण्यात येईल. तसेच अर्जदाराने भरणा केलेल्या रक्कमेतून सदनिकेच्या किंमतीच्या 1 टक्के एवढी रक्कम समपहरण (Forfeit) करुन उर्वरित रक्कम कोणतेही व्याज न देता अर्जदाराच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.


हेही वाचा :


दिवाळीपूर्वीच अनेकांच्या घरी फुटणार फटाके! मुंबई म्हाडाच्या 2030 घरांची आज सोडत; घर मिळाली की नाही हे नेमकं कुठं समजणार?


शेअर मार्केटचा किंग! 1 लाख रुपयांचे दिले तब्बल 7.5 कोटी, टाटांच्या 'या' शेअरने अनेकांना केलं करोडपती