मुंबई :महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना(Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana ) सुरु केली आहे. या योजनेसाठी जुलै महिन्यात अर्ज  केलेल्या अर्जदारांपैकी पात्र असलेल्या 1 कोटी 8 लाख महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे 3000 हजार रुपये पाठवण्यात आले. आता राज्य सरकार ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात 3000 रुपये पाठवणार आहे. यासाठीचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दुसरा राज्यस्तरीय डीबीटी निधी वितरण सोहळा नागपूरमध्ये होणार आहे. हा कार्यक्रम 31 ऑगस्टला होणार आहे. या दिवशी ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या 45 ते 50 लाख महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये पाठवले जाणार आहेत. 


नागपूरमध्ये कार्यक्रम, मान्यवरांची हजेरी 


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा पुण्यात पार पडला होता. त्यावेळी 1 कोटी 8 लाख महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये पाठवले होते. आता नागपूरमध्ये दुसरा राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  या कार्यक्रमाची प्रशासनाकडून तयारी सुरु करण्यात आलेली आहे. 


लाडकी बहीणच्या पैशात कपात करु नका, सरकारचे आदेश


राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये पाठवले जातात. ज्या महिलांच्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे त्यांना या योजनेद्वारे आर्थिक मदत केली जाते. राज्य सरकारनं पहिल्या टप्प्यात महिलांच्या खात्यात पैसे पाठवल्यानंतर काही बँकांनी पैसे कपात करण्यास सुरुवात केली होती. विविध कारणांचा दाखला महिलांच्या बँक खात्यातून पैसे कापले जात असल्याचं समोर येताच राज्य सरकारनं आदेश काढून महिलांच्या खात्यातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमार्फत पाठवण्यात आलेली रक्कम कपात करुन घेऊ नये, अशा सूचना दिल्या होत्या. 


 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी  अर्ज करण्यासाठी कोणताही अंतिम दिनांक नसून कायमस्वरुपी नोंदणी सुरु राहणार असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे. पात्र महिला नारी शक्ती अॅपवरुन या योजनेसाठी अर्ज दाखल करु शकतात. महाराष्ट्र  सरकारला या योजनेसाठी एका आर्थिक वर्षात जवळपास 46 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. महायुती सरकारच्यावतीनं या योजनेची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली होती. 


इतर बातम्या :


Ladki Bahin Yojana : आम्ही लाडकी बहीण योजना थांबवली पाहिजे का? सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला पुन्हा सवाल


Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारचं बळ, आणखी एक जीआर काढला