रायगड : महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरु केली आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जांची पडताळणीची प्रक्रिया सुरु आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना जुलै 2024 ते मार्च 2025 या कालावधीत 9 हप्त्यांची रक्कम मिळाली आहे. ही योजना महिला व बालविकास विभागातर्फे चालवली जाते. या योजनेतून महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. यासाठी काही निकष देखील लागू करण्यात आले आहेत. म्हणजेच शासकीय नोकरीत असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही. याशिवाय ज्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक असेल त्या कुटुंबातील महिलांना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही. राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाकडून विविध विभागांच्या मदतीनं अर्जांची छाननी सुरु आहे. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यातील अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींची संख्या समोर आली आहे. जिल्ह्यातील 15 हजार महिला अपात्र ठरल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे.
रायगडमध्ये किती महिला अपात्र ठरल्या?
राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करता दोन शासन निर्णय जारी केले होते. त्या शासन निर्णयात ज्या अटी निश्चित करण्यात आलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी करण्याचं काम सुरु आहे. त्या नियम आणि अटीत ज्या अर्जदार बसत नाहीत त्यांची नावं वगळली जात आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यातच एकूण 15849 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. अनेक महिलांचे कागदपत्रांच्या त्रुटीमुळे फॉर्म अपात्र झाले आहेत अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयातून देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 जुलै 2024 ते 17 मार्च 2025 या कालावधीत नारी शक्तीदुत अॅप आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवरुन अर्ज भरण्यात आले. नारी शक्तीदुत अॅपवरुन 349919 अर्ज दाखल झाले त्यापैकी 348619 अर्ज मंजूर झाले. तर लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरुन 275791 अर्ज दाखल झाले त्यापैकी 251713 अर्ज पात्र ठरले. तर, एकूण 15849 अर्ज अपात्र ठरल्यानं नामंजूर करण्यात आले.
किती महिलांनी लाभ सोडला?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ नको अशी भूमिका देखील काही महिलांनी घेतली आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील 61 महिलांनी लाभात बसत नसल्याने स्वतःहून आपले अर्ज मागे घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.
लाडक्या बहिणींना आतापर्यंत किती पैसे मिळाले?
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार साधारण पणे 2 कोटी 45 लाख लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या लाभाची रक्कम मिळाली आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत फेब्रुवारीतील महिलांची संख्या अधिक आहे. आतापर्यंत 9 हप्त्यांचे पैसे महिलांना मिळाले आहेत. म्हणजेच एकूण 13500 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची रक्कम काहीच दिवसांपूर्वी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली.
इतर बातम्या :