छत्रपती संभाजीगर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी विविध विभागांच्या मदतीनं करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास विभागाच्या छाननीच्या प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारण्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे.छत्रपती संभाजीगनरमध्ये गेल्या आठ दिवसांपासून महिला स्वतः योजनेचा लाभ नाकारात आहेत.  यासंदर्भात महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी रेश्मा चिमन्द्रे यांनी एबीपी माझासोबत बोलताना माहिती दिली आहे. 


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही महिलांनी अर्ज करुन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ नको असे अर्ज केले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 10 अर्ज दाखल झाले आहेत. 


महिला बालविकास अधिकारी रेश्मा चिमन्द्रे यांनी गेल्या आठ दिवसात विभागाकडे दहा ते बारा अर्ज दाखल झाल्याची माहिती दिली. आम्हाला मिळत असलेल्या लाडकी बहीण योजनेचं अनुदान बंद करण्यात यावं अशा प्रकारचे अर्ज देण्यात येत आहेत. महिलांनी यापूर्वी लाभ घेतलेला आहे आता आम्हाला लाभ नको आहे, असं त्या महिलांनी म्हटलं आहे.  मागील आठ दिवसापासून अशा प्रकारचे दोन तीन अर्ज येत आहेत. आम्ही या योजनेसाठी पात्र होतो, अर्ज केला होता. आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे, लाभ बंद करण्यात यावा असा  उल्लेख करण्यात आला आहे. महिलांच्या अर्जात विशिष्ट कारणं नाहीत मात्र आम्ही आमच्या स्तरावरुन त्याची डॅशबोर्डवरुन पडताळणी करुन लाभ कमी करण्यासंदर्भातील कार्यवाही करु, असं रेश्मा चिमन्द्रे यांनी म्हटलं.


राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील पात्र अपात्र बाबत कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत त्यामुळं त्याबाबत कसलिही कार्यवाही सुरु नाही, असंही रेश्मा चिमन्द्रे म्हणाल्या आहेत. 


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 7 वा हप्ता कधी मिळणार?


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सहा हप्त्यांची रक्कम पात्र महिलांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली आहे. डिसेंबर महिन्यात 2 कोटी 52 लाख लाडक्या बहिणींना योजनेची रक्कम 1500 रुपयांप्रमाणं 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान देण्यात आली होती. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 26 जानेवारीच्या अगोदरपासून जानेवारीच्या लाभाच्या वितरणाची सुरुवात करण्यात येणार असल्याचं म्हटलं.  जानेवारी महिन्यासाठी अर्थ विभागानं महिला व बालविकास विभागाला 3690 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली. 



इतर बातम्या :


Ladki Bahin Yojana : मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार सांगितलं, फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत म्हणाल्या...