मुंबई : महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत नवी माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार या संदर्भातील माहिती दिली आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये वितरित केला होता. नवीन वर्षाचा पहिला जानेवारी महिन्याचा डीबीटी लाभ द्यायला सुरुवात 26 जानेवारीच्या अगोदरपासून सुरु करणार आहोत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.  आर्थिक नियोजन अर्थ विभागाकडून महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालं आहे. जानेवारी महिन्याचा लाभ 26 जानेवारीच्या अगोदरपासून वितरणाला सुरुवात होईल. तीन ते चार दिवसात लाडक्या बहिणींना तो प्राप्त होईल, अशी माहिती आदिती तटकरे यांनी म्हटलं. 


जानेवारी महिन्याच्या लाभाच्या वितरणाची सुरुवात 26 जानेवारीच्या आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार करणार आहोत, असं आदिती तटकरे म्हणाल्या. 2100 रुपयांबाबत नव्या अर्थसंकल्पात किंवा त्यानंतरच्या काळात विचार केला जाईल, असं आदिती तटकरे म्हणाले. जास्तीत जास्त महिलांपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पोहोचवणं आमचा प्रयत्न आहे, असं आदिती तटकरे म्हणाल्या. 


अर्थ विभागाकडून 3690 कोटी रुपयांचा निधी जानेवारी महिन्याच्या वितरणासाठी मिळालेला आहे. फेब्रुवारीसंदर्भात देखील नियोजन सुरु आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावेळेला सुद्धा प्रत्येक महिन्यात कुठेही खंड पडणार नाही यासाठी आम्ही विभाग म्हणून काम करत आहोत, असं तटकरेंनी म्हटलं. डिसेंबर महिन्यात 2 कोटी 47 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला आहे, असं आदिती तटकरे म्हणाल्या. 


काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. काही महिलांनी स्वत:हून लाभ सोडलेला आहे. दुबार नाव नोंदणी, दुसऱ्या योजनांसह या योजनेचा लाभ घेतलेला आहे, तसे असतील किंवा काही महिलांचं उत्पन्न वाढलंय असं लक्षात आल्यानंतर ज्यांनी नावं काढून घेतली अशी नावं कमी होतील. या महिन्यात लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांचा आकडा कायम राहील, त्यात थोडाफार बदल झाला तर एक लाखानं संख्या कमी होईल, असं आदिती तटकरेंनी म्हटलं. 


लाडक्या बहिणींना आतापर्यंत किती रक्कम मिळाली? 


महायुती सरकारनं जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. तेव्हापासून महिलांना 6 हप्त्यांचे 9 हजार रुपये मिळाले आहेत. आता महिलांना जानेवारी महिन्याची रक्कम 26 तारखेच्या आत दिला जाणार आहे. 



इतर बातम्या :