Muhurat Trading : जगभरात आज दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. यंदा दिवाळीनिमित्त देशात मोठा उत्साह असून लोकांची खरेदी जोरदारपणे सुरू आहे. आज शेअर बाजाराला सुट्टी असली तरी मुहूर्त ट्रेडिंगच्या रूपाने शेअर बाजारात एक तासाचे खास ट्रेडिंग सत्र होणार आहे. आज मुहूर्ताचा व्यवहार संध्याकाळी 6.15 ते 7.15 पर्यंत असेल. मुहूर्ताच्या व्यवहारात सौदे करणे शुभ मानले जाते. मुहूर्ताच्या व्यवहारात शेअर्स खरेदी केल्याने समृद्धी येते अशी धारणा आहे.



यामुळेच या दिवशी जवळपास प्रत्येक गुंतवणूकदार शेअर्स खरेदी करतो. एका अहवालानुसार, गेल्या 10 वर्षात शेअर बाजार 7 मुहूर्ताच्या दिवशी हिरव्या चिन्हात अर्थात तेजीत बंद झाला आहे. गेल्या 4 वर्षांपासून सातत्याने मुहूर्ताच्या दिवशी शेअर बाजार नफ्याने बंद झाला आहे. गेल्या वर्षी 2021 मध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास 0.5 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. या वेळीही बाजारात तेजी राहील, अशी आशा गुंतवणूकदारांना आहे.

बाजाराची वाटचाल कशी होईल?
मनीकंट्रोलच्या अहवालानुसार रोजच्या वेळेच्या फ्रेमवर, निफ्टीने अप्पर बेलिंगर बँडजवळ स्पिनिंग टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार केला आहे. हे निर्देशांकातील दिशादर्शकतेचे लक्षण आहे. मोमेंटम इंडिकेटर RSI देखील 55 च्या वर दिसत आहे. तोही वेगवान होत आहे. निर्देशांकात वाढ होण्याची ही चिन्हे आहेत. चार्ट पॅटर्न आणि इंडिकेटर सेटअप सूचित करतात की निफ्टी 17770 आणि नंतर 17919 पर्यंत लहान ते मध्यम कालावधीत पोहोचू शकतात असं जाणकारांचं मत आहे.

हुशारीने गुंतवणूक करा


बाजारातील गुंतवणूकदारांची भावना सकारात्मक असून विविध क्षेत्रांतून खरेदी होतेय. दिवाळीच्या मुहूर्ताच्या वेळी खरेदी करणे शुभ मानले जाते. हे सत्र केवळ एक तासाचे आहे, त्यामुळे नवीन व्यापाऱ्यांनी या काळात काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे..

गेल्या 6 सत्रात बाजारात तेजी


गेल्या 6 दिवसांपासून शेअर बाजार तेजीसह बंद होतो आहे. 21 ऑक्टोबरला शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सेन्सेक्स 100 हून अधिक अंकांच्या वाढीसह 59307 च्या पातळीवर बंद झाला. निफ्टीही वाढीसह 17576 च्या पातळीवर बंद झाला. 17500-17400 वर निफ्टीला चांगला सपोर्ट असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.