Mother Dairy Price Cut: केंद्र सरकारच्या आदेशानंतर मदर डेअरीने सोयाबीन, राइस ब्रान तेलाच्या किंमतीमध्ये प्रतिलीटर 14 रुपयांनी घट केली आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत खाद्य तेल उत्पादक कंपन्यांना केंद्र सरकारने खाद्य तेलाच्या किंमती कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मदर डेअरीनं सोयाबीन आणि राइस ब्रान तेलाच्या किंमती प्रति लीटर 14 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतलाय. 


प्रति लीटर 14 रुपयांनी कपात केल्यानंतर सोयाबीन तेलाची किंमत प्रति लीटर (Poly Pack) 180 रुपये झाली आहे. पूर्वी याची किंमत 194 रुपये प्रति लीटर इतकी होती. राइस ब्रान तेलाची (Poly Pack) किंमत 194 रुपयांवरुन 185 रुपये इतकी झाली आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, दोन आठवड्यात सूर्यफूल तेलाच्या किंमतीमध्येही घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, 16 जून रोजी मदर डेअरीने जागतिक बाजारात खाद्य तेलाची किंमतीमध्ये 15 रुपयांनी कपात केली होती. 
 
केंद्र सरकारने काय दिला होता आदेश?
वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारची खाद्य तेल तयार करणाऱ्या कंपनीसोबत बैठक झाली होती. यामध्ये तेलाच्या किंमती आठवड्याभरात 10 रुपयांनी स्वस्त करण्याचा आदेश केंद्र सरकारकडून कंपन्याना देण्यात आला होता. एकाच कंपनीच्या ब्रँडसाठी देशभरात एकच किंमत ठेवा, असेही सांगण्यात आले होते. त्याशिवाय, पॉकेटवरील वजनापेक्षा कमी तेल असते, या ग्राहकांच्या तक्रारीची सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली होती. कंपन्याना ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करण्याची सूचनाही दिली होती. 


तेलाच्या किंमती एकसमान होणार?
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्याचे पाहून खाद्य सचिव सुधांशू पांडे यांनी खाद्य तेल कंपन्यासोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सध्याच्या परिस्थितीबाबत चर्चा कऱण्यात आली होती. या बैठकीमध्ये तेलाच्या किमती कमी करण्याबाबत चर्चा झाली. तसेच देशभरात तेलाच्या किंमती एकसमान करण्याबाबत निर्णय झाल्याचं समजतेय. कारण, सध्या वेगवेगळ्या शहरांमध्ये तेलाच्या किंमती कमी जास्त आहेत. यामध्ये तीन ते पाच रुपयांचा फरक दिसतोय. हा फरक कमी करण्यात यावा, असे सांगण्यात आले. त्याशिवाय, तेलाच्या किंमती आठवडाभरात दहा रुपयांनी स्वस्त करण्याचा आदेश देण्यात आला. 


आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती घसरल्या -
भारत जवळपास 60 टक्के खाद्य तेल आयात करतो. गेल्या काही महिन्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. याचाच परिणाम भारतीय बाजारात दिसणार आहे. ब्रँडेड खाद्यतेलाच्या किमती कमी होतील. मात्र, प्रिमियम खाद्यतेल ब्रँडच्या किमती कमी व्हायला काहीसा वेळ लागू शकतो. खाद्यतेलाचे भाव कमी झाल्यामुळे परिणामी खाद्यपदार्थांच्या महागाईचा दरही कमी होण्याची शक्यता आहे.