Modi Government : वाढत्या महागाईत केंद्र सरकारनं आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. 1 जूनपासून साखरेच्या निर्यातीवर (Sugar Export) बंदी घालण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यामुळे खाद्यतेलानंतर आता साखरही स्वस्त होणार आहे. देशात यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झालं आहे. त्यामुळे देशांतर्गत साखरेचे दर वाढत होते. त्यामुळे वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे साखर स्वस्त होणार आहे. मात्र या निर्णयामुळे साखर कारखान्यांचं अर्थकारण बिघडण्याचीही शक्यता आहे.
बेलगाम महागाई आटोक्यात आणण्यासाठी मोदी सरकार सातत्यानं कृती करत आहे. गेल्या दहा दिवसांत एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेतले जात आहेत. यामध्ये गव्हाच्या निर्यातीवर बंदी आणि पेट्रोलच्या किमती (Petrol Price) कमी करण्यासाठी उत्पादन शुल्कात कपात यासारख्या मोठ्या घोषणांचा समावेश आहे. महागाईच्या गर्तेतही साखरेचा गोडवा कायम ठेवण्यासाठी काल (मंगळवारी) मोदी सरकारनं आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1 जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे.
मोदी सरकारनं यंदा साखरेच्या निर्यातीचं प्रमाण निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता 2021-22 साखर हंगामात निर्यातदार 100 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त साखर निर्यात करू शकणार नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात साखरेच्या साठ्याबाबत कोणतीही चिंता नसून, गेल्या सहा वर्षांतील साखरेची निर्यात यंदा सर्वाधिक असल्यानं खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची पर्यायी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या माहितीनुसार, 23 मे रोजी देशांतर्गत बाजारात साखरेची सरासरी किंमत 41.58 रुपये प्रति किलो होती. तर कमाल किंमत 53 रुपये प्रति किलो आणि किमान किंमत 35 रुपये प्रति किलो आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी यापूर्वीच केंद्र सरकारनं गहू आणि आटा निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. आता साखरेच्या वाढत्या किंमतींमुळे केंद्र सरकार साखरेच्या निर्यातीवर निर्बंध लावण्याच्या विचारात आहे. या निर्णयाची घोषणा सरकारकडून लवरच करण्यात येण्याची शक्यता आहे.
साखर उत्पादन देशांपैकी भारत मोठा उत्पादक
जगभरातील साखर उत्पादन देशांपैकी भारत हा साखरेचे उत्पादन करणारा मोठा देश आहे. जगभरात साखर निर्यात करण्यात ब्राझीलचा पहिला क्रमांक लागतो. तर साखरेच्या निर्यातीसाठी भारत जगभरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑक्टोबर 2021 ते एप्रिल 2022 दरम्यान भारताने 7.1 दशलक्ष टन साखर निर्यात केली आहे. मे महिन्यात 8 ते 10 लाख टन साखर निर्यात होण्याची शक्यता आहे. 2021-22 मध्ये 90 लाख टन साखर निर्यात होण्याची अपेक्षा आहे. तर यापूर्वी 72 लाख टन साखर निर्यात झाली होती. परंतु, वाढते साखरेचे दर पाहाता केंद्र सरकार साखरेच्या निर्यातीवर मर्यादा आणू शकते. असे झाल्यात वाढत्या किंमतीतून दिलासा मिळेल.