मुंबई : मुंबईमध्ये व्यवसाय चालू करणाऱ्यांसाठी आता सुवर्णसंधी चालून आली आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (MHADA) अखत्यारीतील 173 अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी 27 जून, 2024 रोजी संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली स्वरूपातील ई-लिलाव www.eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर होणार आहे.
पात्र अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली
अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी संगणकीय प्रणालीमध्ये 27 जून रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नोंदणीकृत, अपेक्षित कागदपत्रे अपलोड केलेल्या व अनामत रकमेचा भरणा केलेल्या पात्र अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. 28 जून, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता https://mhada.gov.in व www.eauction.mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीत ई-लिलाव प्रक्रियेत करण्यात आला होता बदल
मुंबई मंडळातील अनिवासी गाळ्यांच्या ई-लिलावामार्फत विक्रीसाठी 27 फेब्रुवारी, 2024 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेमुळे ई-लिलाव प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. बदललेल्या वेळापत्रकानुसार ई-लिलावाचा दिनांक निश्चित करण्यात आला नव्हता. आता आचारसंहिता संपुष्टात आली असल्याने ई-लिलावाचा दिनांक व वेळ मंडळातर्फे निश्चित करण्यात आली आहे.
विक्रीसाठी वसतीनिहाय कोणत्या भागात किती गाळे?
सदर ई-लिलावात मुंबई मंडळातर्फे मुंबईतील विविध वसाहतीनिहाय विक्रीसाठी उपलब्ध अनिवासी गाळ्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे. प्रतीक्षा नगर-शीव येथील १५ दुकाने, न्यू हिंदी मिल-माझगाव 2, स्वदेशी मिल-कुर्ला- 05, गव्हाणपाडा मुलुंड- 08, तुंगा पवई-03, कोपरी पवई-05, मजासवाडी जोगेश्वरी पूर्व-01, शास्त्रीनगर गोरेगाव-01, सिद्धार्थ नगर गोरेगाव-01, बिंबिसार नगर गोरेगाव पूर्व- 17, मालवणी-मालाड- 57, चारकोप भूखंड क्रमांक एक- 15, चारकोप भूखंड क्रमांक दोन- 15 दुकाने, चारकोप भूखंड क्रमांक तीन -4, जुने मागाठाणे बोरिवली पूर्व -12, महावीर नगर कांदिवली पश्चिम –12 दुकाने बोलीसाठी उपलब्ध असतील.
प्रक्रियेत भाग घेण्यासाठी शेवटची मुदत काय?
या ई-लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे, ऑनलाईन अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम भरणे यांसाठी 1 मार्च, 2024 सकाळी 11 वाजेपासून ते दि. 06 जून, 2024 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली.
हेही वाचा :
अनिल अंबानींची 'रिलायन्स पॉवर' शेअर कंपनी बाजारात सुस्साट, गुंतवणूकदारांची रांग; नेमकं कारण काय?
मोठी बातमी! अदानी समुहानं केली 'या' मोठ्या कंपनीची खरेदी, 10422 कोटींचा व्यवहार
आता थेट वाणिज्य मंत्रालय ठरवणार कांद्याचे दर, नाफेड आणि एनसीसीएफचे अधिकार गोठवले : जयदत्त होळकर